
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीकरीता अभिनव अशी लगेज पिकअप सर्व्हीस सुरू केली आहे. या महिन्याच्या अखेर ही सेवा प्रायोगिक तत्वावर नागपूरपासून सुरू होत आहे. त्यामुळे प्रवासाला निघताना अवजड सामान सोबत घेऊन टॅक्सीने रेल्वे स्टेशन गाठण्याची दगदग आता प्रवाशांना करावी लागणार नाही. मुंबईत देखील ही सुविधा मध्य रेल्वे लवकरच लागू करणार आहे.
प्रवाशांना आता रेल्वेने लांब प्रवासाला निघताना त्यांच्यासोबत असलेल्या लगेज ओझं वाहवून टॅक्सीची शोधाशोध करीत रेल्वे टर्मिनस गाठण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. प्रवासी त्यांच्या सोबतच्या बॅगा, किंवा इतर वस्तू पिकअप सर्व्हीसद्वारे काही फि भरून पार्सल करू शकणार आहेत. त्यामुळे या वस्तू गाडी सुटण्याच्या वेळेपूर्वीच पुरीयरद्वारे रवाना होत प्रवाशांच्या आसनांपर्यंत सुखरूपपणे पोहचतील अशी योजना आहे. मध्य रेल्वेने या सेवेसाठी दर देखील निश्चित केले आहे. पंचवीस किलोच्या बॅगेसाठी 10 किलोमीटरच्या परिघापर्यंत 125 रूपये आकारण्यात येणार आहेत. अंतराप्रमाणे या दरात वाढ होणार आहे. 20 किलोमीटरसाठी तीनशे रूपये, 30 किलोमीटरसाठी चारशे रूपये आणि 50 किलोमीटरसाठी 600 रूपये आकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





























































