भेसळयुक्त रसायनाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायो डिझेल सांगून भेसळयुक्त रसायनाची  विक्री करून  ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात दाम्पत्यांसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन टँकरसह १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने ही कारवाई केली.

कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या भाऊ मरगळे आणि अलका मरगळे यांनी टँकरचालकाच्या मदतीने जैवइंधन म्हणजेच बायो डिझेल असल्याचे सांगून ग्राहकांना गंडा घालण्यास सुरूवात केली होती. वारजे येथील डुक्कर खिंडीजवळील मोकळ्या जागेत येथे बायो डिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त रसायन भरलेले टँकर उभे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना मिळाली. संबंधीत ठिकाणी टँकरमध्ये भरलेले भेसळयुक्त रसायन ट्रक, लक्झरी, टँकर, चारचाकी वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या भरले जात त्यानंतर पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, आयओसीएल कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक निशांत गुप्ता, चिवडशेट्टी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने डुक्कर खिंडीजवळील मोकळ्या जागेत छापा घातला. तेथे उभ्या असलेल्या टँकरमधील १५० लिटर भेसळयुक्त रसायन, एक रिकामा टँकर असा सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

संबंधीत रसायन हे वाहनांमध्ये वापरल्याने पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच मानवी जिवीताला धोका निर्माण करणारे, कार्बन मोनाक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन ऑक्साईड, पार्टोक्युटेल मॅटर या प्रकारचे घातक वायु निर्माण करत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधीत ठिकाणी पेट्रोल पंपाप्रमाणे अल्ट्रेशन केलेल्या टँकरला नोझलची जोडणी करून डिजीटल मीटरमध्ये प्रमाण पाहून मागणीनुसार ग्राहकांना संबंधीत रसायन विक्री केली जात असल्याचेही उघड झाले. या प्रकरणात तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी करीत आहेत.