
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या क@बिनेटमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या दोघांची वर्णी लागणार आहे. मूळचे कर्नाटकचे असलेले डॉ. विवेक मूर्ती यांना आरोग्य व मानव सेवा मंत्री, तर मूळचे कोलकात्यातील असलेले प्रा. अरुण मजुमदार यांना ऊर्जा मंत्रीपदी संधी मिळणार आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘पॉलिटिको’ या अमेरिकन वृत्तपत्रांनी ही शक्यता वर्तवली आहे.
डेमोक्रेटीक पार्टीचे ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कोरोना टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्या फोर्सचे नेतृत्व 43 वर्षीय डॉ. मूर्ती यांच्या हाती दिले आहे. त्यांची सहअध्यक्षपदी नेमणूक केली आहे. ते कोरोनाविरोधातील लढय़ात बायडेन यांचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. तसेच स्टॅन्फोर्ड विद्यापीठाचे प्रा. अरुण मजुमदार यांनी ऊर्जासंबंधी विविध विषयांत बायडेन यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे. ते ‘अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी-एनर्जी’चे पहिले संचालक म्हणून कार्यरत होते. आरोग्य आणि ऊर्जा या दोन्ही मंत्रीपदासाठी आणखी काही दावेदार आहेत. मात्र बायडेन यांचा हिंदुस्थानी वंशाच्या मूर्ती व मजुमदार यांच्या कार्यपद्धतीवर मोठा विश्वास आहे.
पवई आयआयटीमधून मजुमदार यांनी घेतली पदवी
मूळचे कोलकाता येथील असलेले प्रा. अरुण मजुमदार यांचे शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई शहराशीही तितकेच जवळचे नाते आहे. त्यांनी पवईतील आयआयटीमधून पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी घेतली. पुढे अमेरिकेत त्यांच्या नेतृत्वाला वाव मिळत गेला.
n ऊर्जा मंत्रीपदासाठी माजी ऊर्जा मंत्री अर्नेस्ट मोनिज, स्टॅन्फोर्ड यूनिव्हर्सिटीचे स्कॉलर डॅन रीचर आणि माजी उपऊर्जा मंत्री एलिजाबेथ शेरवुड रॅण्डल हेसुद्धा दावेदार आहेत. दुसरीकडे उत्तरी कॅरोलायनाची आरोग्य व मानव सेवा मंत्री मॅण्डी कोहेन आणि न्यू मॅक्सिकोची गव्हर्नर मिशेल लुजान ग्रीशम यांनाही आरोग्य व मानव सेवा मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.


























































