
राज्यात याआधी सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या सुमार कामगिरीचा महावितरणला मोठा फटका बसला असून त्याच काळात विजबिलाची थकबाकी फुगली आहे. ऊर्जाविभागात काम करताना त्यांनी सरासरी कार्यक्षमताही दाखवली नाही. वीज बिलाची वसुलीही केली नव्हती. त्यामुळेच थकबाकीचा आकडा 50 हजार कोटींच्या जवळपास गेला होता असा आरोप ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ट्विट करत केला आहे.
महावितरणच्या वीज बिल थकबाकीचा आधीच डोंगर असताना कोरोना महामारीमुळे त्यात भर पडली असल्याचेही उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत जवळपास नऊ हजार कोटींनी थकबाकी वाढली आहे. मार्चमध्ये घरगुती ग्राहकांकडे 1374 कोटी रुपयांची थकबाकी होती, ती ऑक्टोबर अखेर 4824 कोटी रुपये झाली. वाणिज्यक ग्राहकांच्या थकबाकीचा आकडा 1241 कोटी तर औद्योगिक ग्राहकांची थकबाकी 982 कोटीपर्यंत पोहचली असल्याचे ट्विट उर्जामंत्र्यांनी केले आहे.

























































