चार वर्षे कशी जातील हे भाजपला कळणारही नाही! जयंत पाटील यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे शपथ घेऊन आम्हाला एक वर्ष पूर्ण झाले. हे एक वर्ष कसे गेले, हे भाजपला कळलेही नाही. उरलेली चार वर्षेदेखील कशी जातील हे त्यांना कळणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लगाविला आहे.

जयंत पाटील म्हणाले, एक वर्षात सरकार अनेक संकटांना सामोरे गेले. कोरोनाचे संकट सर्वांत मोठे होते. राज्य सरकारने सर्व पद्धतींचा वापर करून कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्याचा महसुलावर परिणाम झाला. आता सगळे पुन्हा उभे करण्याचे काम हळूहळू सुरू झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे राज्य सरकारचे पुढच्या महिन्या-दोन महिन्यांत उत्पन्न वाढेल. त्यानंतर राज्य सरकार अधिक गतीने काम करेल. शपथ घेतल्यानंतर कोरोना येईपर्यंत राज्य सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. हा धाडसी निर्णयांचा सपाटा आगामी काळातही सुरू राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.