हिंदुस्थानची सीनियर क्रिकेट निवड समिती कार्यकारिणी, आगरकर, कुरुविल्लामध्ये रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या सीनियर क्रिकेट निवड समितीत कोणाची वर्णी लागतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे. सरणदीप सिंग (उत्तर विभाग), देवांग गांधी (पूर्व विभाग) व जतीन परांजपे (पश्चिम विभाग) यांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे तीन जागांसाठी चुरस लागली आहे. पश्चिम विभागातून अजित आगरकर व अॅबी पुरूविल्ला या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये रस्सीखेच लागताना दिसत आहे.

अॅबी पुरूविल्ला याने हिंदुस्थानसाठी 10 कसोटी व 25 वन डे सामने खेळले आहेत. दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने 25 फलंदाजही बाद केले आहेत. तसेच 2008 ते 2012 या कालावधीत हिंदुस्थानच्या ज्युनियर निवड समितीतही तो कार्यरत होता. हिंदुस्थानच्या ज्युनियर संघाने 2012 साली अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकला होता. मुंबई क्रिकेट संघाचा निवड समिती प्रमुख म्हणूनही त्याने कामगिरी केलेली आहे.

अजित आगरकर याच्याकडेही दांडगा अनुभव आहे. त्याने हिंदुस्थानसाठी 26 कसोटी, 191 वन डे व चार टी-20 सामने खेळले आहेत. मुंबई क्रिकेट संघाचा निवड समिती प्रमुख म्हणूनही त्याने कामगिरी केलेली आहे.

दरम्यान, याआधी सुनील जोशी (दक्षिण विभाग) व हरविंदर सिंग (मध्य विभाग) यांची निवड समितीत निवड करण्यात आली आहे. तसेच अजित आगरकर, अॅबी पुरूविल्ला यांच्यासह मनींदर सिंग, शिवसुंदरदास, चेतन शर्मा हेही निवड समिती पदाच्या शर्यतीत आहेत.