देशाची अर्थव्यवस्था सुधारतेय, पण कासवाच्या गतीने! ईपीएफओच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
epfo-pic

कोरोना महामारीचा फटका बसलेली हिंदुस्थानी अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येतेय. पण या सुधारणेचा वेग मात्र कासवगती आहे.त्यामुळे अर्थक्षेत्र आणि कामगारक्षेत्र पुन्हा पूर्ववत व्हायला काहीसा विलंब लागणार आहे, असा निष्कर्ष कर्मचारी निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सर्वेक्षणातून काढला आहे. नोंदणीपृत कंपनी आस्थापनांची संख्या ऑक्टोबरमध्ये 30,000 ने  घसरलेली आहे.म्हणजे अद्याप बहुतांश उद्योग आणि कंपन्या कोरोना लॉकडाउनच्या फटक्यातून सावरलेल्या नाहीत असे ईपीएफओचे निरीक्षण आहे.

देशाच्या कामगार क्षेत्रातील कंपन्या आणि त्यातील कामगारांच्या ईपीएफओ खात्यातील नोंदींवर या क्षेत्राची प्रगती दिसून येते. livemint.com.या संकेतस्थळाच्या सर्वेनुसार यंदा सप्टेंबरमध्ये ईपीएफओकडे नोंद असलेल्या कंपन्यांची संख्या 5,34,869 इतकी होती.तीच संख्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला 30 हजारांनी घसरून 5,04,044 वर आली आहे. नोंदणीकृत कंपन्यांची संख्या कमी झाल्याने यंदा ऑक्टोबरमध्ये ईपीएफओमध्ये आपला पेन्शन फंड जमा करणाऱया कामगारांची संख्या ऑक्टोबरमध्ये 18 लाखांनी घटली आहे.

संकट अद्याप पूर्ण संपलेले नाही
कोरोना लॉकडाऊनमधून सवलती मिळाल्याने देशातील उद्योग क्षेत्र पुन्हा हळूहळू सुधारणेच्या पायरीवर येतेय. पण कोरोनामुळे बसलेला आर्थिक फटकाआणि त्यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे संकट अद्याप पूर्ण संपलेले नाहीय असे अर्थतज्ञांचे मत आहे. कामगार क्षेत्र सणासुदीच्या काळात आशादायी वातावरणामुळे सुधारणेच्या वाटेवर जाताना दिसतेय. गेले काही महिने या सुधारणेचा वेग बरा होता.पण ऑक्टोबर महिन्यात तो पुन्हा मंदावला आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये असणारा देशाचा बेरोजगारी दर ऑक्टोबरअखेरीस 6.7 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर पोचला आहे. तर रोजगार दर 38 टक्क्यांवरून 37.8 टक्क्यांवर घसरला आहे.