ज्ञानाचा-कर्तृत्वाचा दाखला फक्त मुंबई-पुण्याकडेच नाही! शरद पवार यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्यांच्या जीवनकार्याची माहिती अनेकांना नाही अशा कर्तृत्ववान स्त्रीयांचे आयुष्य कर्तृत्ववान मराठा स्त्रीया या पुस्तकाद्वारे प्रकाशझोतात आले आहे. ज्ञानाचा व कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुण्या-मुंबईकरांकडे नाही, असा दाखला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पुस्तकातील कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख करीत दिला.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे संपादित कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाला आमदार अॅड. आशीष शेलार आणि चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, या पुस्तकातील काही भगिनींचे कार्य मी जवळून पाहिले आहे. हौसाताई पाटील, जयमाला शिलेदार, आनंदीबाई शिर्पे, लक्ष्मीताई नायकवडी, हिराबाई बडोदेकर यांचे कर्तृत्व जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. यातील काही भगिनींनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात दिलेले योगदान लक्षणीय आहे. राजकारण, कला व सार्वजनिक जीवनात तसेच व विविध क्षेत्रांत कार्य केलेल्या परिचित आणि अपरिचित अशा भगिनींच्या जीवनाचे वास्तव चित्रण पुस्तकात उत्तमरीत्या केले आहे. त्यांच्या कार्याची नोंद या पुस्तकाच्या रूपाने घेण्यात आली याचा मला आनंद असल्याचे शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान मराठा स्त्रीयांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे. राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. त्याला माझ्यासारख्या माणसाचे समर्थन असू शकते, असे भाजपचे आमदार अॅड. आशीष शेलार म्हणाले.