
गेल्या काही महिन्यांपासून देश कोरोनाच्या सावटाखाली असून आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यातील शासन जनसामान्यांच्या समस्या सोडून शेतकरी हिताच्या योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, मांजरपाडा प्रकल्पाचे अपूर्ण काम सुरू होऊन जूनअखेरपर्यंत काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
पाटील यांनी बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाला भेट देत सदर प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर येवला येथील शिष्टमंडळाशी बोलताना त्यांनी आश्वासन दिले. तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी देणाऱया देवसाने तथा मांजरपाडा प्रकल्पाचे काम हे गेल्या मार्च 2019 पासून निधीअभावी बंद आहे.
महाआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळातच लॉक डाऊन झाल्याने या प्रकल्पाच्या अपूर्ण कामाला पुन्हा ब्रेक लागला होता. पालकमंत्री छगन भुजबळ या प्रकल्पाच्या कामासाठी सतत आग्रही असून त्यांच्या विनंती सूचनेवरून जलसंपदामंत्री पाटील यांनी प्रकल्पाची पाहणी करून अपूर्ण कामाचा आढावा घेतला.
पाटील यांनी मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर येवला येथील शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. सदर प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नाने पाटील यांच्या सोबत पाणी आंदोलक मोहन शेलार, वसंत पवार, सुनील पैठणकर, नवनाथ काळे आदींनी चर्चा करून निधीची मागणी केली. या वेळी मांजरपाडा प्रकल्प, पुणेगाव ते दरसवाडी अस्तरीकरण, दरसवाडी ते बाळापूर कालवा दुरुस्ती, कालवा लेव्हल, अस्तरीकरण तसेच अनपुटे येथील रेल्वे क्रॉसिंग या कामाबाबत सविस्तर चर्चा झाली. जूनअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदामंत्री यांनी अधिकाऱयांना केल्याची माहिती मोहन शेलार यांनी दिली.




























































