बाप-लेकाची ‘आतडे’ पिळवटून टाकणारी कहाणी…व वडिलांनीलहान आतडे दान करून मुलाचा जीव वाचवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगावर पांघरुण ओढोनिया काळे

देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले

लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून

पिता जो जगाचा बैसे जागत अजून

नीज नीज माझ्या बाळा करू नको चिंता

काळजी जगाची साऱया आहे भगवंता…

‘श्यामची आई’ चित्रपटातील पित्याची महती सांगणारी ही अजरामर अंगाई! आई ही मातेसारखी असते, तिच्यात आपली मुळे घट्ट रोवलेली असतात. पण बाप हा त्या मुळांना, मातीला ओलावा देणारा असतो… बाप-मुलाच्या नात्याची अशीच ‘आतडे’ पिळवटून टाकणारी ही कहाणी आहे बीडमधील! कोरोनाने लहान आतडय़ाला गंभीर इजा झालेल्या आपल्या चिमुकल्या मुलाला त्याच्या बाबाने जीवदान दिले… ऐन दिवाळीत बाबांनी दिलेले हे आयुष्यभराचे गिफ्ट… त्या चिमुकल्याच्या चेहऱयावर आनंदाचे कारंजे फुलवून गेले…

ओम संतोष घुले. दहा वर्षांचा चिमुकला. तीन महिन्यांपूर्वी त्याला कोरोनाची बाधा झाली. कोरोनाचा विळखा सोडवून ओम बरा झाला पण काही दिवसांनी त्याला पोटदुखीचा असह्य़ त्रास सुरू झाला. अनेक तपासण्या केल्यानंतर कोरोनाच्या विषाणूंनी त्याच्या लहान आतडय़ाची पार चाळणी केल्याचे दिसून आले. लहान आतडय़ाचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. ज्यूपिटर रुग्णालयाचे डॉ. गौरव चौबळ यांनी लहान आतडे दान करणाऱया दात्याचा शोध सुरू केला. परंतु वेळ जात होता आणि ओमचे हाल बघवत नव्हते. शेवटी संतोष घुले यांनीच आपले लहान आतडे त्याला देण्याचा निर्णय घेतला.

दानशूरांचे दातृत्व कामी आले

ओमच्या उपचारासाठी संतोष घुले यांनी जवळचे सारे पैसे खर्च केले. शस्त्र्क्रियेसाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले. ओमला बरे करण्यासाठी अनेक दानशूरांनी मदत केली. त्यातूनच ही अवघड शस्त्रक्रिया पार पडली. ओमवर अजूनही काही उपचार बाकी आहेत, त्यासाठी पैसे लागणार असून, त्यासाठी दात्यांनी 9766167397 या गुगल पे क्रमांकावर मदत करण्याचे आवाहन संतोष घुले यांनी केले आहे.