बेस्टकडे एकूण 6337 बसेसचा ताफा होणार, साल 2022 पर्यंत 2462 नवीन बसेसची खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 3875 बसेस अंतर्भाव आहे. त्यामध्ये 1099 भाडे तत्त्वावरील बसेसचा समावेश आहे. याशिवाय 300 इलेक्ट्रीक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच 600 सीएनजी बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 31 मार्च 2022 पर्यंत बस ताफा 6337 इतका करण्याची योजना आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन वर्षांत 2462 नव्या बसेस मिळणार असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली आहे.

बेस्टचा ताफा वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे बेस्टच्या अर्थसंकल्पात म्हटले आहे. 2021-22 या वर्षांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाडय़ांमधून मिळणारे उत्पन्न 272 कोटी रुपये असताना त्यावरील खर्च मात्र 762 कोटी रुपये इतका दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या भाडेतत्वावरील बसेसमुळे बेस्ट प्रशासनाला 490 कोटी रुपयांचा तोटा दाखविण्यात आला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा चालविताना बेस्ट प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. जेणेकरून उपक्रमाला तोटा सहन करावा लागणार नाही, असे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी बेस्टच्या समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले आहेत.