
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी काही प्रमाणात वाढणाऱया रुग्णसंख्येमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा अलर्ट ठेवण्यात आली आहे. यामध्ये 36 कोरोना सेंटर दोन दिवसांत तर 427 कोविड सेंटर केवळ आठ दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील अशी व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे 70 हजारांवर बेड उपलब्ध होऊ शकतात. दरम्यान, मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्यामुळे सध्या 54 कोविड सेंटरमध्ये रुग्णांना उपचार दिले जात आहेत.
मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने सुमारे 500 हून जास्त कोविड हेल्थ सेंटर सुरू केली होती. पालिकेच्या उपाययोजनांमुळे सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला आहे. असे असले तरी सद्यस्थितीत वाढवण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमुळे जास्त नोंदवली जाणारी रुग्णसंख्या आणि लॉकडाऊन खुले झाल्यामुळे व दिवाळीत मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या गर्दीमुळे पुढील 15 दिवस रुग्णवाढ दिसणार असल्याचा अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र ही रुग्णवाढ गणेशोत्सवानंतर झालेल्या वाढीप्रमाणे नसेल आणि लवकरच नियंत्रणातही येईल असा विश्वासही पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, पालिकेने आरोग्य यंत्रणा तैनात ठेवताना बफर प्रकारात म्हणजेच दोन दिवसांत सुरू करता येतील अशी 36 कोविड केअर सेंटर तर आठ दिवसांत सुरू करता येतील अशा रिझर्व्ह प्रकारात 427 कोविड केअर सेंटर तैनात ठेवली असल्याची माहिती दिली. ही सर्व सेंटर्स सुरू झाल्यास तब्बल 70 हजार 518 बेड उपलब्ध होऊ शकतात.
शेकडो आयसीयू, व्हेंटिलेटर बेड रिक्त
कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे कोविड केअर सेंटरमधील 21 हजार 697 बेड रिक्त आहेत. याशिवाय 1978 पैकी 830 आयसीयू, 8423 पैकी 5866 ऑक्सिजन बेड, 1184 पैकी 393 व्हेंटिलेटर बेड सद्यस्थितीत पालिकेकडे रिक्त असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
गरज भासल्यास खासगी रुग्णालये ताब्यात घेणार
पालिकेची संपूर्ण आरोग्य व्यवस्था तैनात असली तरीदेखील मुंबईकरांनी आवश्यक खबरदारी मात्र घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, गरज पडल्यास खासगी रुग्णालये, नर्सिंग होम कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेता येतील अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत केवळ 2 हजार 846 रुग्णांमध्ये लक्षणे
मुंबईत सक्रिय असलेल्या 8 हजार 474 पॉझिटिव्ह रुग्णांमधील 5 हजार 628 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणेच नाहीत. तर लक्षणे असलेल्या 2 हजार 147 रुग्णांमध्ये लक्षणे असूनही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. तर 699 जणांची प्रकृती मात्र खालावलेली असून त्यांच्यावरही आवश्यक उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी पाहता सद्यस्थितीत मुंबईत केवळ 2 हजार 846 रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणे असल्याचे स्पष्ट होते.





























































