
कोरोना संसर्गांच्या आजाराच्या दृष्टीने शहरासाठी आगामी तीन महिने धोक्याचे आहेत अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने अधिक जोखमीचे असतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या दृष्टीने शासकीय पातळीवर सतर्कता बाळगली जात आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाला, तर राज्य शासनाने त्या त्या जिल्ह्याच्या-शहराच्या स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट रोखण्यासाठी आतापासून प्रयत्न करा असे सांगितले आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने उपाययोजनांसाठी काम सुरु केले आहे.
या बद्दल माहिती देताना डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, सध्या कोरोना रुग्णांची संख्या सव्वाशे-दीडशेच्या दरम्यान आहे, त्यामुळे तेवढी चिंता नाही, पण येत्या काळात जसजशी थंडी वाढत जाईल तसतशी चिंता वाढणार आहे. नागरिकांनी विनामास्क फिरण्याचे धोरण अवलंबले तर कोरोनाची साथ रोखता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे मास्क वापरण्यासह सुरक्षित वावर, सॅनीटायझरचा वापर महत्वाचा आहे, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. डिसेंबर महिन्यात तुलनेने थंडी कमी असते, पण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात थंडी वाढते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या तुलनेत हे दोन महिने कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेच्या दृष्टीने चिंता वाढवणारे ठरु शकतात. कोरोनाबाधितांवर उपचार करण्याच्या दृष्टीने महापालिकेची तयारी पूर्णपणे आहे. कोरोनाच्या चाचण्या देखील वाढवल्या जात आहेत. मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरमध्ये येत्या एक महिन्यात ऑक्सिजन प्लांट सुरु होईल. अन्य कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवरील उपचारासाठीच्या आवश्यक त्या सुविधा आहेत, त्यात गरजेनुसार सुधारणा करण्याची देखील महापालिकेची तयारी आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा सुरुवातीपासूनच कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामात होती, पुढेही प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेचे काम सुरुच राहील. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.





























































