खेड – जगबुडी पुलावर वाहतुकीची कोंडी; जोडरस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महामार्गावरील भरणे नाका येथे उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने जगबुडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. जगबुडी पुलाच्या जोडरस्त्यावर पडलेले खड्डे या ठिकाणी होणाऱ्या वाहतुक कोंडीचे कारण ठरत आहेत. जोडरस्त्यावरील खड्डे तात्काळ भरले गेले नाही तर या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड तालुक्याच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमिटरच्या रस्त्याचे काम कल्याण टोलवेज इंफ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून सुरु आहे. 44 किलोमिटरच्या अंतरात अन्य ठिकाणी चौपदरीकरणाचे काम बऱ्यापैकी पुर्ण झाले आहे. मात्र भरणे नाका येथील कामालाच ग्रहण लागले आहे.

गेल्या वर्षी भरणे नाका येथे भुयारी मार्गासाठी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. त्यामुळे भरणे नाका परिसरात वाहतुकीचा पुर्ण बोजबारा उडाला होता. काही महिन्यांनंतर ठेकेदाराने खोदलेला खड्डा भरण्यास सुरवात केली. त्यामुळे अनेकांना — महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात नेमकं काय चाललं आहे?’ असा प्रश्न पडला. नंतर कळलं की आता भुयारी मार्ग रद्द करून या ठिकाणी उड्डाण पुल बांधला जाणार आहे.

गेले काही महिने या ठिकाणी रात्रंदिवस उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने भरणे नाका परिसरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. भरणे नाका हा परिसर नेहमीच पादचाऱ्यांनी गजबजलेला असतो. याच ठिकाणांहून महामार्गावरील हजारो वाहने धावत असतात. जगबुडी पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्या वाहतुकीस योग्य असता तर कदाचीत एवढी वाहतुक कोंडी झाली नसती. परंतू पुलाचा जोडरस्ता खड्ड्यात गेला असल्याने जगबुडी पुलावर वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. उड्डाण पुलाचे सुरु असलेले काम आणि पुलाच्या जोडरस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपनीला योग्य त्या सुचना कराव्यात अशी मागणी होत आहे.