
कोरोनाला नियंत्रणात आणण्यात यश आले असतानाच आता मुंबई महानगरपालिकेने टीबी आणि पुष्ठरोग निवारण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवार, 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱया या मोहिमेत 50 लाख लोकांची तपासणी होणार असून टीबीचा संशय असलेल्या व्यक्तीला त्याचा ‘एक्स-रे’ मोफत काढता येणार आहे. त्यासाठी अशा व्यक्तींना तपासणी व्हाऊचर देण्यात येणार आहेत.
मुंबईत क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1 ते 16 डिसेंबरपर्यंत एक संयुक्त मोहीम राबवली जाणार आहे. या महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, मुंबईकरांनी पालिकेच्या आरोग्य तपासणी पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या परिसरामधील साधारपणे 12 लाख 12 हजार 693 घरातील 50 लाख 9 हजार 277 व्यक्तींची क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी करण्यात येणार आहेत. मोहिमेसाठी महापालिकेची 3 हजार 451 पथके कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय तपासणी दरम्यान घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर असल्यास हे पथक दिवसातील इतर वेळीदेखील भेट देऊन तपासणी करणार आहे. प्राथमिक तपासणी दरम्यान आढळणाऱया क्षयरोग संशयिताच्या थुंकीची तपासणी करण्यासह क्ष-किरण चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी संशयित रुग्णांच्या परिसराजवळ असणाऱया मुंबई महानगरपालिका, सरकारी, खासगी क्ष-किरण केंद्रांमध्ये मोफत केली जाणार आहे. संशयिताला विशेष तपासणी व्हाऊचर देण्यात येणार आहे. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीने तातडीने महापालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातून कुष्ठरोगाची तपासणी करवून घ्यावी. कुष्ठरोगाचे लवकर निदान करून औषधोपचार चालू केल्यास होणारे शारीरिक व्यंग टाळता येते, असे आरोग्य विभागाने सांगितले.





























































