कोल्हापूर – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी उद्या (आज) मंगळवार दि.1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या दोन्ही मतदारसंघांत अपक्षांसह एकुण 120 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.परंतु प्रचारा दरम्यान महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने पाहता,मतदार कोणाला कशी पसंती क्रमांक देतील याचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

पुणे पदवीधर मतदार संघासाठी प्रमुख पक्ष आणि अपक्षांसह एकुण 68 उमेदवार निवडून रिंगणात आहेत.या मतदार संघात एकुण 89 हजार 529 इतके नोंदणी केलेले पदवीधर मतदार आहेत.तर शिक्षक मतदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण 52 शिक्षक उमेदवार असुन, 12 हजार 237 मतदारांमधुन त्यांना मतदान होणार आहे.सर्व मतदारांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पोहचुन मतदानासाठी गळ घालण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे.

दरम्यान पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुक मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून,नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 1 हजार 840 जणांचे प्रशिक्षण नुकतेच तालुकास्तरावर पुर्ण झाले आहे. तसेच 366 मायक्रो ऑब्झरवरांचे प्रशिक्षण पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

जिल्ह्यात पदवीधरसाठी 205 आणि शिक्षकसाठी 76 असे एकूण 281 मतदान केंद्रांची संख्या आहे.पदवीधर मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्ष,मतदान अधिकारी क्रमांक 1 , मतदान अधिकारी क्रमांक 2,मतदान अधिकारी क्रमांक 3 आणि शिपाई असे एकूण 1 हजार 25 जणांची नियुक्ती आहे.शिवाय 315 राखीव असे एकूण 1 हजार 340 नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण तालुकास्तरावर पार पडले आहे.

शिक्षक मतदान केंद्रासाठी 380 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून, 120 राखीव असे एकूण 500 अधिकारी,कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे.त्याचबरोबर 281 मायक्रो ऑब्झरवर, 85 राखीव अशा एकूण 366 जणांचेही प्रशिक्षण झाले आहे.पुणे येथूनही ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेचे कामकाज, मतदान कक्षाची रचना, मतदान पेटीचा वापर कसा करावा, मत पत्रिका, विविध शिक्के, शाई, स्केचपेन यांचा वापर, मतदार ओळखपत्र तपासणी, विविध प्रकारचे नमुने व फॉर्म्स भरणे, त्याचबरोबर मास्क, सॅनिटाझर, थर्मल स्कॅनर, सामाजिक अंतर याबाबतही या प्रशिक्षणात सूचना देण्यात आल्या आहेत.