
गावठी कट्टा बाळगणाऱया एकाला अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी कट्टय़ांसह 11 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. विलास श्रीपत काळे (वय 65, रा. सलाबतपूर, ता. नेवासा) याला अटक करण्यात आली असून, त्याचा मुलगा पाल्या विलास काळे हा फरार आहे.
सलाबतपूर गावात काळे हा जिवंत काडतुसांसह गावठी कट्टे कमरेला लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून नेवासा पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या पथकाने सलाबतपूर शिवारातील दिघी चौकाजवळील नजनवस्तीजवळ सापळा रचला. घरी जात असलेल्या विलास काळे याला पकडून त्याच्या ताब्यातून 80 हजार रुपयांचे दोन गावठी कट्टे आणि साडेपाच हजार रुपये किमतीची 11 जिवंत काडतुसे असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. दरम्यान, पोलिसांनी काळे याची कसून चौकशी केली असता, त्याला हे कट्टे त्याचा मुलगा पाल्या काळे याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी विलास काळे याला अटक करून नेवासा पोलिसांत दोघा पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
































































