
मतदान केंद्रात अनधिकृतरीत्या प्रवेश करून मतदारांवर प्रभाव पाडल्याप्रकरणी भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंढरपूरच्या मुख्याधिकाऱयांनी फिर्याद दिली आहे.
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे पंढरपूर येथील कवढेकर शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 189 या मतदान केंद्रावर अनधिकृतरीत्या जाऊन पाहणी करत होते. यावर बूथ प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता.
तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तक्रार देण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पंढरपूरच्या मुख्याधिकाऱयांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार गाडेकर करीत आहेत. दरम्यान, भाजपनेही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांच्याविरुद्धही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दिली आहे.




























































