विकास प्रकल्पांतील 1313 झाडांच्या बदल्यात 7886 झाडे लावणार, 15 प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या विकासकामांत येणारी 1313 झाडे तोडण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली असली तरी या झाडांच्या बदल्यात तब्बल 7886 झाडे लावण्याचे निर्देशही वृक्ष प्राधिकरणाने दिले आहेत.

तीन बैठकांमधील 15 प्रस्ताव आज प्रशासनाकडून मांडण्यात आले. यामध्ये सरकार आणि पालिकेच्या विविध प्रकल्पातील 5089 झाडे हटवण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

मुंबईत राबवण्यात येणार्‍या कोणत्याही प्रकल्पात येणारी झाडे तोडावयाची असल्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी अनिवार्य असते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून 5089 झाडे कापणे आणि हटवण्याचे प्रस्ताव आज मांडण्यात आले. मात्र यामध्ये जास्तीत जास्त झाडे वाचवावीत अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

यानुसार 15 प्रस्तावांतील 1313 झाडे कापण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र २6२6 झाडे नवीन लावण्याचे निर्देश देण्यात आले. तर 1४8४ झाडे न कापता पुनर्रोपित करून त्यांचे संगोपन करण्याचे निर्देश दिल्याची माहितीही यशवंत जाधव यांनी दिली. दरम्यान, पर्यारवण रक्षणासाठी शिवसेना नेहमीच झाडे वाचवण्याची भूमिका घेत राहणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

शिवडीतील झाडांच्या बदल्यात वसईत लागवड

शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी शिवडी येथे कापण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात वसई येथील राजवली, कामन गावात झाडे लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी  सुमारे दोन हजार झाडे लावण्यात येणार आहे. महालक्ष्मी येथे कापण्यात येणार्‍या झाडांच्या मोबदल्यात रेसकोर्सच्या परिसरात झाडे लावली जाणार आहेत.

प्रकल्पासाठी हटवल्या जाणार्‍या झाडांमध्ये शिवडी न्हावाशेवा या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्पात 420 झाडे कापण्याचा 526 झाडे पुनर्रोपित करणे, तर महालक्ष्मी येथे बांधण्यात येणार्‍या पूल आणि उड्डाणपुलासाठी 175 झाडे कापणे 81 पुनर्रोपित करणे अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.