
कचरा वर्गीकरण करत असताना पुणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मारहाण करून 7 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील जिजाई गार्डनजवळ घडली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास खिलारे (वय 23) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी खंडू देडे (वय 45 ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार यांचा भाचा विकास ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करत होते. त्यावेळी आरोपी हा दुचाकीवरून त्याठिकाणी आला. या ठिकाणी कचरा कशाला टाकता, अशी दमदाटी सुरू केली. त्यावेळी तक्रारदार यांनी महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी असल्याचे सांगून कचरा टाकत नाहीत. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करत असल्याचे सांगितले. तरीही आरोपीने न ऐकता तक्रारदार यांच्या भाचाला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यांच्या खिशातील 7 हजार रुपये घेऊन गेला. याप्रकरणी वारजे पोलिस अधिक तपास करत आहेत.
























































