जैन मंदिर चोरीप्रकरणी सहाजणांची टाळी गजाआड, 13 लाखांचा ऐवज जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील जैन मंदिरातील चोरीप्रकरणी सहाजणांच्या टोळीला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 30 किलो चांदी, 27 ग्रॅम सोने व दुचाकी असा 13 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली. यावेळी उपअधीक्षक बाबूराव महामुनी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे उपस्थित होते.

रामा अशोक कोरवी (वय 25), संदीप रवींद्र जामदार (वय 40), अनिल बाबासाहेब चौगुले (वय 38, सर्व रा. इचलकरंजी), दीपक रामू दमाने (वय 43, रा. कबनूर, ता. हातकणंगले), राहुल भास्कर कांबळे (वय 35, रा. कोंडीग्रे, ता. शिरोळ), श्यामराव बाळू काळुंगे (वय 58, रा. मादळमुठी, ता. खानापूर, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अपर अधीक्षक गायकवाड म्हणाल्या,   24 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी रामा कोरवी याने दुचाकीवरून येऊन खिद्रापूर येथील जैन मंदिरात चोरी करताना कुरुंदवाड पोलिसांनी पकडले होते.

त्याची चौकशी केली असता साथीदारासोबत शिरोळमधील हेरवाड, बस्तवाड, निमशिरगांव, दानोळी, हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे, मिणचे, किणी, रांगोळी, कबनूर या ठिकाणी व कर्नाटकातील एकसंबा येथील जोतिबा मंदिरातील चोरी केल्याचे कबूल केले आहे. चोरीचे चांदीचे दागिने श्यामराव काळुंगे या सोनाराकडे देत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यालाही अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहायक निरीक्षक व्ही. जी. अडसूळ, अनिल चव्हाण, अविनाश मुंगसे, शहाजी फोंडे, प्रकाश हंकारे, असिफ शिराजभाई, प्रवीण मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.