
सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी हिंदुस्थानचा झेंडा जगात फडकवला. ‘युनेस्को’ व लंडनच्या ‘वार्की’ फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा तब्बल सात कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ रणजीतसिंह डिसले यांना आज जाहीर झाला. असा पुरस्कार मिळविणारे डिसले पहिलेच हिंदुस्थानी ठरले आहेत.
पाठय़पुस्तकात क्यूआर कोडचा वापर करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात त्यांनी अभिनव क्रांती केली. त्यांच्या या कामाची दखल घेत जगभरातील 140 देशांतील 12 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लंडनमधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये झालेल्या समारंभात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिपृत घोषणा केली.
पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले आहे.

























































