
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार आगेपूच सुरू आहे. रात्री दहा वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार संभाजीनगर, पुणे नागपूर पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे उमदेवार आघाडीवर होते. भाजप पूर्णपणे पराभवाच्या छायेत आहे. मात्र धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मूळ काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अमरिश पटेल यांनी जागा राखण्यात यश मिळवले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेच्या सहा जागांसाठी ही पहिलीच निवडणूक झाली. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरुवातीला वैध मतांचे गठ्ठे तयार करण्याचे काम पूर्ण झाली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. रात्री दहा वाजेपर्यंत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होती, पण यामध्ये महाआघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. या निवडणुकीत महाआघाडी बाजी मारणार हे स्पष्टपणे दिसत आहे. पण संपूर्ण मतमोजणी होऊन प्रत्यक्षात निकाल जाहीर होण्यास शुक्रवारची पहाट होण्याची चिन्हे आहेत.
रात्री दहा वाजेपर्यंतचा कल
संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण आघाडीवर
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरुण लाड आघाडीवर
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी आघाडीवर
पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर आघाडीवर
अमरिश पटेल विजयी
मात्र धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे अभिजित पाटील यांचा पराभव केला.
अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते, तर अभिजित पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अमरिश पटेल यांनी ही जागा राखण्यात यश मिळवले आहे.
58 वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी 24 हजार, भाजपचे संदीप जोशी 16 हजार अशी पहिल्या पसंतीची मते यांना मिळाली. या मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 25 वर्षे तर गंगाधरराव फडणवीस यांनी 12 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. 58 वर्षानंतर महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली आहे.






















































