पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीचा छापा, महत्त्वाच्या कागदपत्रांसह माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली येथे एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीत विदेशाकडून मिळालेल्या निधीचा वापर करण्यात आल्याच्या संशयावरून सक्त अंमलबजावणी संचनालय (ईडी ) पथकाने आज गुरुवारी सकाळी बायजीपुरा येथील पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयावर छापा मारला.

ईडीच्या अधिकाऱ्य़ांनी तीन तासांच्या झडतीनंतर लेखा विभागातील महत्त्वाच्या कागदपत्रांसह दिल्ली दंगलीतील जमा केलेल्या पुराव्याच्या फायलींसह माजी जिल्हाध्यक्षास चौकशीसाठी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एकाच वेळी छापे मारण्यात आले. या छापेसत्रामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

संभाजीनगर शहरातील बायजीपुरा रोडवरील गंजेशहिदा मशिदीच्या पाठीमागे पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाचे विभागीय कार्यालय आहे. गुरूवारी सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्य़ांनी पीएफआयच्या पदाधिकाऱ्य़ांशी संपर्क केला. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास दोन इनोव्हा कारमध्ये आलेल्या पाच ते सात अधिकाऱ्य़ांच्या पथकाने कार्यालयावर छापा मारला. यावेळी ईडीच्या पथकाच्या ईश्वर नावाच्या अधिकाऱ्य़ाने पीएफआयचे माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम सय्यद अजीज यांच्यासह शहराध्यक्ष इरफान मिल्ली यांची कसून चौकशी केली.

तीन तासांची चौकशी करून पथकाने कार्यालयातील लेखा विभागाच्या फायलींसह विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्य़ा शिष्यवृत्तीसंबंधीची फाईल, पीएफआय कार्यालयाच्या विविध उपक्रमांच्या फायलींसह दिल्ली दंगलीबाबत पीएफआय पक्षाने जमा केलेली कागदपत्रे तसेच त्याबाबत दिलेल्या निवेदनाची फाईल, असा मोठा गठ्ठा ताब्यात घेत माजी जिल्हाध्यक्ष सय्यद कलीम सय्यद अजीज यांना ताब्यात घेतले. यावेळी शहर पोलिसांसह एटीएस पथकानेदेखील घटनास्थळी धाव घेतली होती.