
मुलांमध्ये शालेय जीवनातच पर्यावरण व वातावरणीय बदलांबद्दल सजगता निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या आत कोंडण्यापेक्षा त्यांना पर्यावरण व वातावरणीय बदलासंदर्भातील शिक्षण वर्गाबाहेर व प्रात्यक्षिकाद्वारे देण्याचा प्रयत्न व्हावा, असे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
अभ्यासक्रमासाठी युनिसेफसमवेत उद्देशीय करार
6 ते 14 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक गुणवत्तापूर्ण शालेय अभ्यासक्रम तयार करण्यासंदर्भात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि युनिसेफ यांच्यामध्ये उद्देशीय करार करण्यात आला.
याला पर्यावरण क्षेत्रातील विविध सहयोगी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभणार आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल संबंधी महत्वाच्या मुद्यांवर प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासोबतच पर्यावरण शिक्षण, पाणी, स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विविध घटकांचे एकत्रीकरण करण्यासंदर्भातील काम या कराराच्या माध्यमातून केले जाणार आहे.
यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे गुरुवारी पर्यावरणीय गोलमेज परिषद झाली. परिषदेचा उद्देश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणीय शैक्षणिक अभ्यासक्रम विकसित करून महाराष्ट्राच्या पर्यावरणीय समस्यांकडे लक्ष वेधणे हा आहे.
पर्यावरणीय व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, युनिसेफच्या प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मंत्री ठाकरे म्हणाले, पंचतत्वांचे रक्षण करून पर्यावरणाचे कार्बन फुटप्रींट कमी करण्यासाठीची सुरूवात म्हणजे ‘माझी वसुंधरा’ अभियान होय. लॉकडाऊन काळात जसे स्वच्छ समुद्र, निरभ्र आकाश दिसत होते तसेच ते कायमस्वरूपी होणे गरजेचे आहे.





























































