लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची तपासणी; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई पथकाकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱयांनी अचानक भेट दिली. येथील मोठय़ा रासायनिक कारखान्यांची तपासणी करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शुक्रवार सायंकाळपासून सुरु झालेली ही तपासणी शनिवारपर्यंत सुरू होती. या तपासणीदरम्यान या पथकाने नेमकी काय तपासणी केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे येत आहेत. या तक्रारी सुरु असतानाच महामार्गावरील आवाशी फाटा येथे रस्त्यालगत वाहणाऱया नाल्यात घातक रसायन ओतताना दोन टँकर चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या टँकरचालकांनी दिलेल्या माहितीवरून ते घातक रसायन वनवीड आणि योजना इंडस्ट्रिज या रासायनिक कारखान्यांचे असल्याचे स्पष्ट झाले होते.

या पार्श्वभूमीवर परिसरातील ग्रामस्थ तसेच राजकिय पक्षांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयातील दोन पथके लोटे औद्योगिक वसाहतीत दाखल झाले. या पथकांनी येथील घरडा, एक्सल, पुष्कर, सुप्रिया लाईफ सायन्स, विनिती, युएसव्ही, कसाई नेरोलक तसेच सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची तपासणी केली.

या पथकाने नेमकी काय कारवाई केली? हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधला असता याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.