मुंबईत 80 टक्के आगी शॉर्टसर्किटनेच! दिवसाला 15 फायरकॉल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील दाटीवाटीच्या वस्ती, उत्तुंग इमारती आणि व्यावसायिक कंपन्यांमध्ये लागणाऱया आगींमधील तब्बल 80 टक्के आगी या शॉर्टसर्पिटने लागत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये वर्षाला सुमारे साडेपाच हजार म्हणजेच महिन्याला 450 आणि दररोज तब्बल 15 फायर कॉल पालिकेच्या अग्निशमन दलाकडे येतात. या आगीची वर्दी मिळतात अग्निशमन दलाचे जवान तातडीन घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करतात.

मुंबईत झपाटय़ाने वाढणाऱया औद्योगिकीकरणात वीज व्यवस्थेची सुविधा केल्यानंतर किमान पाच वर्षांनी त्याचे ऑडिट करणे आवश्यक असते. शिवाय नियमित देखभाल करणे गरजेचे असते. मात्र कोणत्याही व्यावसायिकांकडून, सोसायटय़ांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी लाइटची व्यवस्था केल्यानंतर वर्षानुवर्षे कोणतेही ऑडिट किंवा देखभाल होत नसल्यामुळे आगीची ठिणगी पडते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि तपासणी करताना संबंधितांना धोकादायक वीज व्यवस्थेचे ऑडिट करण्यास सांगण्यात येते. मात्र अग्निशमन दलाकडेही कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने कार्यवाही होत नाही. शिवाय वीज कंपन्यांकडूनही ऑडिटची सक्ती केली जात नाही. त्यामुळेच शॉर्टसर्पिटने आगी लागण्याचे प्रकार घडतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पालिकेच्या अभ्यासक्रमात समावेश करणार!

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी घरमालक किंवा कंपन्या-आस्थापनांनी वेळोवेळी आपल्या वीज व्यवस्थेचे ऑडिट, तपासणी करून आवश्यक काळजी घ्यायला हवी. आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे, जनजागृती व्हायला हवी. यासाठी पालिकेच्या आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही अग्निसुरक्षेचे धडे देण्यासाठी अभ्यासक्रमात समावेश करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिकेचे नवनियुक्त अग्निशमन दल प्रमुख कैलाश हिवराळे यांनी सांगितले.

महिन्याला सरासरी 450 आगी

मुंबईत वर्षभरात सुमारे साडेपाच हजार आगी लागतात. यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळी वारे आणि जोरदार पाऊस यामुळे शॉर्टसर्पिट होऊन आगी लागण्याचे प्रमाण वाढते, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या आगी लागताच अग्निशमन दलाच्या माध्यमातून तातडीने बचावकार्य करण्यात येते.