
एखाद्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट अथवा पोस्ट टाकली जाते त्यावेळी जगातील हिंदुस्थानसारखे इतर लोकशाही देश संबंधितांवर काय कारवाई करतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज याचिकाकर्ते व प्रतिवाद्यांना केली तसेच त्याबाबत माहिती देण्याचे आदेश संबंधितांना दिले.
नवी मुंबईतील रहिवासी सुनैना होली यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह व बदनामी करणारे व्यंगचित्र 25 ते 28 जुलै दरम्यान अपलोड केले होते याप्रकरणी पोलिसांनी तिच्या विरोधात विविध कलमाअंतर्गत तीन गुन्हे दाखल केले आहेत.
एफआयआर रद्द करण्यात यावी तसेच अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपी महिलेने हायकोर्टात अॅड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने सुनावणी 14 डिसेंबरपर्यंत तहकूब केली तसेच सोशल मीडियावर द्वेषयुक्त ट्विट अथवा पोस्ट एखाद्याविरोधात अपलोड केल्यास जगातील इतर लोकशाही देश संबंधितांवर काय कारवाई करतात त्याबाबत माहिती देण्याचे आदेश खंडपीठाने पक्षकारांना दिले.
























































