नाशिक – प्लास्टिक पिशव्यांमधील अवैध मद्यसाठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इर्टिगा कारमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमधून मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचला. त्याठिकाणी कार येताच तिची झडती घेण्यात आली. कारसह सुमारे नऊ लाखांचा अवैध मद्यसाठा भरारी पथकाने हस्तगत केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा येथे शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्र्यंबकेश्वर-जव्हार रस्त्यावरील अंबोली फाटा येथे शुक्रवारी पहाटे इर्टिगा कार अडवून झडती घेण्यात आली. त्यात क्रेटमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत दारू भरली असल्याचे लक्षात आले. सुमारे साठ पिशव्या पथकाने जप्त केल्या आहेत. गुजरातच्या अमरोली चारोसी येथील प्रियंक बिपीन पटेल (30) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक उषा वर्मा, उपायुक्त अर्जुन मोहळ, अधिक्षक मनोहर अंचुळे, उपअधिक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर राख, अरूण सुत्रावे, राम सुपेकर, हेमंत नेहरे, शाम पानसरे आदींनी पार पाडली.