
सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. आज देखील सराफा बाजारात सोने-चांदीची चमक कमी झाली. गुरुवारी सोन्याचा भाव 95 रुपयांनी कमी झाला, तर चांदीचा भाव 169 रुपयांनी खाली आला.
कोरोनावर लस येत असल्याची बातमी येताच सोने-चांदीचे दर कमी होऊ लागले. गुंतवणूकदार पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे सोने-चांदीचा दर सतत खाली येत आहे. आजही भाव पडल्याने सोने प्रति तोळा 49,220 रुपयांवर स्थिरावले, तर चांदीचा एक किलोचा दर 62,431 रूपये झाला.

तब्बल 7 हजारांची घसरण
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने 56 हजारांवर गेले होते. रेकॉर्ड उंची गाठलेल्या सोन्याचा दर नंतर मात्र हळूहळू कमी होऊ लागला. गेल्या 4 महिन्यात सोने 7 हजार रुपयांनी खाली आले आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात 75 हजारावर गेलेला चांदीचा दर आता 13 हजारांनी कमी झाला आहे.

तुफान खरेदी
ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याचा दर कमी झाल्याने नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या खरेदीत 16 टक्के वाढ नोंदवण्यात आली. लग्न सराई सुरू झाल्याने आणि भाव देखील कमी झाल्याने आगामी काळात सोने-चांदीची खरेदी आणखी वाढेल अशी आशा सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
























































