
>> राही भिडे
शरद पवारांचे राजकारण समजणे तसे कठीणच. राजकारणापासून दूर असलेले त्रयस्थदेखील त्यांचे राजकारण ‘एन्जॉय’ करीत असतील. त्यांच्या राजकारणाचे विविध पैलू थक्क करणारे असतात. कार्यकर्तेच नव्हे, तर सर्वपक्षीय राजकारणी मंडळींना पवारांच्या अनाकलनीय राजकारणाची गूढता ही त्यांची मुत्सद्देगिरी वाटते. एक मात्र खरे, राजकारण हे प्रवाही असल्यामुळे दिलेला शब्द पाळला जाईलच याचा भरवसा नसतो, पण उद्धव ठाकरे यांना पवारांनी दिलेला शब्द तब्बल एक तपानंतर 12 वर्षांनी पाळला हे सांगितले तर कोणाचा विश्वासही बसणार नाही, पण हे घडले त्याची मी साक्षीदार आहे.
त्याचे झाले असे की, शरद पवारांनी एका कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडला जाताना मला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. सकाळी 7 वाजता मुंबईहून निघायचे होते. पवार कोलकात्याहून रात्रीच्या विमानाने उशिरा आले होते. तेथे बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याविरुद्धची कोर्ट केस होती. 2008 साल होते, पवार केंद्रात कृषिमंत्री होते आणि राज्यात विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आम्ही बरोबर 7 वाजता निघालो. विशेष म्हणजे, तत्पूर्वी पवारांच्या दोन भेटी झालेल्या होत्या. त्यांच्या कामाचा उरक भन्नाट आहे. त्यांनी वृत्तपत्रे सोबत घेतली. आमचं संभाषण सुरू असताना पवारांना फोन आला. तो होता उद्धव ठाकरे यांचा. उद्धव यांनी स्वामी समर्थांचं एक वचन मिश्किलपणे उद्धृत केले. ते म्हणाले, ‘‘साहेब, मी तुमच्या पाठीशी आहे.’’ पवारांनी मला, ‘‘मागे पहा, उद्धव आहे’’ असे सांगितले. उद्धव यांची गाडी मागेच होती. ते पुण्याला निघाले होते, आम्ही अलीकडे पिंपरी-चिंचवडला जाणार होतो. त्यांचे अनौपचारिक बोलणे संपले. डावीकडे वळण्यासाठी आमच्या गाडीचा वेग कमी करण्यात आला. उद्धव यांची गाडी पुढे निघाली अन् पवारांनी त्यांची गंमत केली. त्यांना फोन केला, त्यांचे अर्धे संत वचन पूर्ण केले. म्हणाले, ‘‘उद्धव, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’’ हेच ते पवारांचे शब्द तब्बल 12 वर्षांनी आता खरे झाले आहेत. दोघांनी गमतीने का होईना, एकमेकांच्या पाठीशी राहण्याचा दिलेला शब्द विद्यमान सरकार स्थापनेच्या प्रक्रियेपासून आजपर्यंत खरा करून दाखवला आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यासाठी उद्धव यांचे मन वळवले. त्यांना ‘‘मी तुझ्या पाठीशी आहे’’ असा विश्वास दिला, मुख्यमंत्रीपदी आल्यापासून उद्धव यांचा आत्मविश्वास वाढला आहे, जनमानसात त्यांची प्रतिमा उजळली आहे. या सरकारमधील वाद, समस्या, पेचप्रसंग सोडवून मार्गदर्शन करण्याची भूमिका पवार पार पाडीत आहेत. कोरोना काळात अतिवृष्टीग्रस्त भागात पायाला भिंगरी लावून फिरणारा, लोकांच्या समस्या समजून घेणारा, समस्या सोडविण्यासाठी मार्ग सुचवणारा, त्याचबरोबर सरकार 25 वर्षे टिकणार असा विश्वास सत्ताधारी नेत्यांना देणारा हा लोकनेता. त्यांची कन्या सुप्रियाला एकदा विचारले, ‘‘कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पवारसाहेबांना तुम्ही कुटुंबीय दौऱयावर कसे जाऊ देता?’’ त्यावर सुप्रियाचे उत्तर होते, ‘‘लोकांमध्ये जाणे हे त्यांचे टॉनिक आहे. ते घरात बसू शकत नाहीत आणि कोणाचेच ऐकत नाहीत. त्यांचे कार्यक्रम त्यांनी ठरवून टाकलेले असतात.’’ 55 वर्षांहून अधिक काळ राजकारणात राहून राज्याला विकासाची दिशा देणाऱया पवारांच्या वयाला 80 वर्षे पूर्ण झाली. वय आणि प्रकृती अस्वास्थ्याचा बाऊ न करता कोणत्याही समस्याग्रस्त भागात जाऊन पोहोचण्याचे कर्तव्य बजावणारा नेता आज पवारांशिवाय दुसरा नाही. त्यांच्या प्रत्येक राजकीय खेळीबाबत शंका व्यक्त करण्यात आल्या. परंतु त्यांना लावलेले बोल, त्यांच्याबद्दलचे गैरसमज आपल्या कृतीने आणि दूरदृष्टीने दूर करण्याचे त्यांनी ठरवलेले दिसते. भरपावसात प्रचाराचे भाषण करून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे तसेच निवडणूक फिरवण्याचे काम त्यांनी केले हे त्याचेच द्योतक आहे. टीका, विरोधकांचे हल्ले, निवडणुकीतील यशापयश पचवून लोकांमध्ये राहण्यातच आनंद मानणारा हा लोकनेता आहे.
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)



























































