लोकनेता – पवारसाहेब सेंच्युरी ठोकतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  दिलीप वेंगसरकर 

राजकारणातील ‘जाणता राजा’ म्हणूनच त्यांना ओळखले जाते. ते राजकारणातील बापमाणूस आहेत, अशी कबुली त्यांचे विरोधकही देतात… राजकीय, सामाजिक, सहकार, क्रीडा अशा सर्कच क्षेत्रांत आपल्या नेतृत्काची छाप पाडणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त अभीष्टचिंतन करतानाच त्यांचे ‘क्रिकेट’मधील मित्र हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलेले हे मनोगत… 

शरद पवार हे राजकारणातील ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जात असले तरी आम्हा क्रीडापटूंचे, क्रीडाप्रेमींचे ते ‘कॅप्टन’च आहेत. शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करतोच, पण आमचे हे ‘कॅप्टन’ दणक्यात शतक साजरे करणारच, अशा भरभरून शुभेच्छाही देतो!

शरद पवार हे मुरब्बी राजकारणी असले तरी त्यांचे खेळांविषयीचे प्रेम अफाट आहे. क्रिकेटसह कुस्ती, कबड्डी, खो-खो या अस्सल लाल मातीतील खेळांवरही त्यांनी प्रेम केले आणि या खेळांच्या प्रसारासाठी अफाट कार्य केले. शरद पवार आणि क्रिकेट हे नाते सर्वश्रृत आहे.

त्यांच्या उपस्थितीत माझा सन्मान झाला तेव्हा शरद पवार यांच्यातील ‘कॅप्टन’ मला पहिल्यांदा सापडला. वानखेडे स्टेडियमवर मी माझा शंभरावा कसोटी सामना खेळालो तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनने माझा सत्कार करण्याचे ठरवले. पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांच्याच उपस्थितीत माझा सन्मान झाला. त्यांची आणि माझी ती पहिली भेट. त्यानंतर या ना त्या निमित्ताने आम्ही भेटत राहिलो ते आजतागायत.

शरद पवार म्हणजे अफाट काम हे समीकरणच आहे. ‘एमसीए’त त्यांचे हे अफाट काम अगदी जवळून बघायला मिळाले आणि मी पवारांचा जणू ‘फॅन’च झालो.

शरद पवार एमसीएच्या अध्यक्षपदी असताना मी उपाध्यक्ष म्हणून दहा वर्षे काम केले. राजकारणात नेहमीच व्यस्त असतानाही त्यांनी एमसीएची एकही बैठक कधी चुकवली नाही. उलट त्या बैठकींना ते वेळेच्याआधी उपस्थित असत. ही शिस्त मी त्यांच्याकडून शिकलो. मुंबई क्रिकेटचा कायापालट पवारांनीच केला. सुरुवातीला शिवाजी पार्क, आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान व माटुंग्यातील मैदानापर्यंत मर्यादित असलेल्या मुंबई क्रिकेटला पनवेल, कल्याण, विरारपर्यंत त्यांनी नेले. बीकेसी, कांदिवलीतील क्लबची निर्मिती असो किंवा बारामतीमधील अव्वल दर्जाचे स्टेडियम, ही सर्व किमया त्यांच्यामुळेच. महाराष्ट्रातील कानाकोपऱयात क्रिकेट पोहचवले.

एमसीएनंतर बीसीसीआय आणि आयसीसी… पवारांनी क्रिकेटच्या या तिन्ही संघटनांचे कुशल नेतृत्व केले आणि क्रिकेटला वलय निर्माण करून दिले. हिंदुस्थानी क्रिकेटला त्यांनी स्थैर्य दिले. शरद पवार यांची केवळ ज्येष्ठ राजकीय नेते, उत्तम प्रशासक एवढीच ओळख पुरेशी नाही तर क्रिकेटची उत्तम जाण असलेले ते नेते आहेत. म्हणूनच मी त्यांना आदराने ‘कॅप्टन’ म्हणतो.

शरद पवारांनी बीसीसीआयसह हिंदुस्थानातील सर्व क्रिकेटपटूंना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. हिंदुस्थानी संघासाठी खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंना पेन्शनची सुविधा आहे. पण या पेन्शनच्या रकमेत भरघोस वाढ शरद पवारांनी केली. त्यांच्या या निर्णयामुळे देशातील असंख्य क्रिकेटपटूंचे निवृत्तीनंतरचे जीवन सुकर झाले. जे खेळाडू सध्या हयात नाहीत, त्यांच्या पत्नींना या पेन्शनमुळे फायदा झाला. माजी क्रिकेटपटूंसह शरद पवारांनी देशातील युवा खेळाडूंनाही भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आयपीएलचा श्रीगणेशा झाला आणि क्रिकेट आणखी श्रीमंत झाले. युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध झाली. याचसह ज्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पुरेशा संधी मिळत नाहीत, त्या खेळाडूंनाही आयपीएलमध्ये आपली चुणूक दाखवता आली. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.

सचिन तेंडुलकरचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न तब्बल 22 वर्षांनंतर पूर्ण झाले. तेही त्याच्या घरात अर्थातच मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये. वर्ल्ड कपसारख्या प्रतिष्ठsच्या स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यासाठी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला. त्याआधी आयसीसीने वानखेडे स्टेडियमची पाहणी केली होती. या स्टेडियममध्ये बकेट सीटसह काही सुधारणा करण्याच्या सूचना आयसीसीकडून देण्यात आल्या. यानंतर शरद पवारांच्या पुढाकारामुळे वानखेडे स्टेडियमचं रूपडं बदललं. देशातीलच नव्हे तर जगातील अव्वल दर्जाचे स्टेडियम आकाराला आले.

शरद पवार यांनी केवळ क्रिकेटच नव्हे तर इतर देशी खेळांना, खेळाडूंनाही भरघोस प्रोत्साहन दिले. हिंदुस्थानातील क्रिकेटचे सुवर्णयुग साकारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे हे मी क्रिकेटपटू म्हणून ठामपणे सांगू शकतो. असे हे आमचे ‘कॅप्टन’ शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’

एक किस्सा आठवतो, हिंदुस्थानचा क्रिकेट संघ 2007 साली इंग्लंड दौऱयावर गेला. त्यावेळी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष होते. आणि मी निवड समितीत होतो. प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि हिंदुस्थानी संघातील खेळाडू यांच्यामधील वाद चव्हाटय़ावर आले होते. टीम इंडियाला नव्या प्रशिक्षकाची गरज होती. शरद पवारांनी चंदू बोर्डे यांना टीम इंडियासोबत इंग्लंडला पाठवले. चंदू बोर्डे हे तेव्हा वयस्कर होते. पण तरीही शरद पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. राहुल द्रविडच्या नेतृत्वात हिंदुस्थानी संघाने कसोटी मालिका जिंकली. हा होता शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक.

(लेखक हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत.)