चंद्रावर ‘डोंगर’ राहतील का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

चंद्रावरून माती आणि खडक यांचे अनेक नमुने अनेक देश अभ्यासासाठी घेऊन येत आहेत. या स्पर्धेत चीनने नुकताच प्रवेश केला आहे. चांद्रमोहिमांचे महत्त्व निश्चितच आहे, परंतु अवकाशातून कोणी व किती संसाधने आणावीत यावर नियंत्रण ठेवणारा कोणताच कायदा अस्तित्वात नाही. यामुळे अवकाश कायद्यांची निर्मिती व विकास होणे आता आवश्यक वाटत आहे. अन्यथा आज गोल दिसणारा चंद्र आणि त्यावरील डोंगर आणि विवरांच्या सुंदर नैसर्गिक रचना भविष्यात बदललेल्या असतील. देशोदेशींच्या चांद्रमोहिमांद्वारा चंद्रावरील धातू, खनिजे, माती आणि इतर संसाधने  अक्षरशः ओरबाडून पृथ्वीवर आणण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे आज चंद्रावर दिसणारे ‘डोंगर’ उद्या दिसतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खगोलशास्त्र म्हणजे औत्सुक्य आणि गूढता यांचा सुंदर मिलाप आहे. विश्व इतके अफाट आहे की, त्यात कितीही शोध लावले तरी नवनवीन शोध सातत्याने लागत असतात. पृथ्वीवर जे काही उपलब्ध आहे त्याची उत्सुकता तर आहेच; त्यासोबत अवकाशातील खजिन्याची पण ओढ आहे. आजही आपल्याला पृथ्वीवरील अनेक सूक्ष्मजीव, खनिजे आणि इतर सृष्टी नव्याने ज्ञात होत असते. परंतु जसे आपण पृथ्वीबाहेर झेप घेतली तसे बाहेरच्या विश्वात अजून काय आहे, आपल्याला तिथे वस्ती करता येईल का अशी जिज्ञासा निर्माण झाली. पण त्याला येऊ लागलेले व्यापारी स्वरूप आणि अवकाशस्पर्धा पाहता मात्र ते आपल्याला कुठे नेईल हे सांगता येत नाही.

हे गहन प्रश्न निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत. यात मुख्य कारण म्हणजे, चंद्रावरून माती आणि खडक यांचे अनेक नमुने अनेक मोहिमा आपल्यासोबत अभ्यासासाठी घेऊन येत आहेत. या स्पर्धेत चीनने नुकताच प्रवेश केला आहे. चीनचे चँग 5 हे प्रोब मिशन सुरक्षितपणे चंद्रावर उतरले आहे. चंद्रावरील मातीचे आणि खडकांचे नमुने परत आणणारा अमेरिका व रशियानंतरचा हा तिसरा देश ठरणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या उत्तर भागातील मॉन्स रुम्कर या पर्वतावरून 2 किलो माती व खडकांचे नमुने आणण्याची योजना आहे. 1969 ते 1972 या कालावधीत अमेरिकेच्या अपोलो चांद्रमोहिमांमधून जवळपास 382 किलो नमुने पृथ्वीवर आणले आहेत. 1970 ते 1976 या कालावधीत रशियाने अमानवी लुना मोहिमांमधून 301 ग्रॅम नमुने आणले होते. चांद्रमोहिमांचे महत्त्व निश्चितच जास्त आहे. यामुळे अनेक राष्ट्रांच्या नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत.

जसे पृथ्वीवर दुर्मिळ असलेले धातू आपण चंद्रावरून आणू शकतो. चंद्रावर प्लॅटिनम समूहातील काही धातू मुबलक प्रमाणात असण्याची शक्यता आहे. अशा एखाद्या दुर्मिळ धातूचे अस्तित्व मानवी वस्तीसाठी संसाधन होऊ शकेल. यामुळे चंद्रावर आपण काही रचना किंवा बांधकाम निर्माण करू शकतो किंवा अवकाशात इतरत्र रचना निर्माण करण्यास मदत होऊ शकते. इस्रोतर्फे हिंदुस्थानी शास्त्रज्ञ चंद्रावर रचना तयार करण्यासाठी विटा निर्मितीची शाश्वत प्रक्रिया विकसित करीत आहेत. काही दुर्मिळ धातूंना धोरणात्मकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानले जाते. कारण ते इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रिक वाहन बॅटरीज आणि सैन्य उपकरणे यांच्या निर्मितीचा अविभाज्य भाग आहेत. शिवाय नुकतेच चंद्रावर पाणी असल्याचा सबळ पुरावा पुढे आला आहे. त्यामुळे मानवी वस्तीची शक्यता अधिकच प्रबळ झाली आहे. तसेच पुढील चांद्रमोहिमा आखणे सोपे झाले आहे. तसेच चंद्रावरील कमी गुरुत्वीय शक्तीमुळे चंद्राकडून रॉकेटस् प्रक्षेपित करणे पृथ्वीपेक्षा ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यायाने कमी खर्चिक असेल. आणखी एक चंद्रावरील स्रोत आहे हेलियम 3. हा आयसोटोप आण्विक फ्यूजन इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. पृथ्वीवर हेलियम 3 हा दुर्मिळ प्रमाणात सापडणारा वायू आहे. चंद्राच्या सुरुवातीच्या संशोधनामध्ये चंद्रावर हेलियम 3 कोटय़वधी टन प्रमाणात उपलब्ध असावा असे भाकीत केले होते.

अनेक देशांच्या चंद्रावर मानवी मोहिमा पाठविण्याच्या योजना सुरू आहेत. यामुळे एकूणच सर्व राष्ट्रांमध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण होत आहे. अनेक लोकांच्या मते ‘अवकाश’ हे राष्ट्रांमध्ये शांती व सौहार्दाचे द्योतक आहेत. चंद्रावर ठेवलेले पहिले मानवी पाऊल हे शांतीसाठी आहे हे जगजाहीर आहे. परंतु अवकाशातून कोणी व किती संसाधने आणावीत यावर नियंत्रण ठेवणारा कोणताच कायदा अस्तित्वात नाही. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये अनेक अवकाश संस्था आपापली याने चंद्रावर पाठविणार आहेत. तसेच चंद्रावरून परत आणावीत अशी संसाधने ही चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पसरलेली नसून काही ठिकाणी एकवटली आहेत. त्यामुळे यात राष्ट्रांमध्ये संघर्षाच्या अनेक शक्यता निर्माण होतात.

चंद्रावर पाणी आणि लोह यासारख्या संसाधनांमुळे पृथ्वीवरून पाठविण्यात येणाऱया मोहिमांमध्ये ही संसाधने पाठविण्याची गरज कमी होणार आहे. ही संसाधने चंद्रावरूनच गोळा करता येतील, शिवाय चंद्रावर काही रचना निर्माण करायच्या असतील तर लोहाची मदत होईल. पाणी तर माणसाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे चंद्रावर पाणी आणण्याची गरज भासणार नाही. नुकतेच चंद्रावर घेतलेले मुळ्याचे पीक हे चंद्रावरील भावी शेतीच्या शक्यता निर्माण करते. शिवाय महाग असले तरी पाण्याच्या विघटनामधून निर्माण झालेला ऑक्सिजन श्वसनाकरिता आणि हायड्रोजन इंधन म्हणून वापरता येईल. संसाधनांच्या या सगळ्या उपयुक्ततेमुळे चंद्रावरून माती व खडक आणणे हे काही नवीन नाही. आधुनिक संशोधनामध्ये चंद्रावर सौरऊर्जा वापरता येईल का, याविषयी प्रयोग चालू आहेत. यात सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रत्येकजण चंद्रावरील एकाच भागातून एकाच प्रकारची संसाधने गोळा करीत आहे. यासाठी अनेक खासगी कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट दिले जात आहे. आपण हे ओरबाडून तर घेत नाही? पृथ्वीप्रमाणेच आपल्याकडे चंद्रही एकच आहे!

जेथे सूर्य जवळ जवळ सतत चमकत असतो, अनादी काळापर्यंत प्रकाशमय असणार आहे असे चंद्रावरचे ठिकाण स्थावर मालमत्तेसाठी उपयोगात आणावे का? सौर पॅनेलमधून ऊर्जानिर्मितीची ही जागा आहे का? वास्तविक हे कोणत्या स्तरावर असू शकते? शोषित? या उपक्रमांचे फायदे कसे आणि कोणापर्यंत पोहोचणार? यातून होणाऱया संशोधनाचा फायदा कोणाला व कसा मिळणार? तो पुन्हा राष्ट्रांमध्ये वैमनस्य निर्माण करेल की मैत्री? आज सामान्य जन या संशोधनाकडे किती गांभीर्याने पाहत आहेत, असे अनेक प्रश्न यामधून निर्माण होतात. केवळ चंद्रच नव्हे तर अनेक अवकाशस्थ वस्तू आहेत जेथून आपण त्यावरील नमुने अभ्यासासाठी आणत आहोत. मंगळावरील आणि त्याचे नैसर्गिक उपग्रह फोबोस आणि डीमोस यांच्यावरील खडकांना आणण्याच्या योजना आखल्या जात आहेत. इटोकावा लघुग्रहांवरून जपानने नमुने आणले आहेत. अमेरिकेच्यादेखील अशा भावी मोहिमा आहेत. असे नमुने घेताना ड्रिल करावे लागते. त्यात त्या अवकाशीय वस्तूंचे काही नुकसान होत असेल. त्याच्या नैसर्गिक रूपावर परिणाम होत असेल. वाइल्ड 2 या धूमकेतूवरून काही नमुने आणण्यात यश मिळाले आहे. याकरिता स्टारडस्ट मोहीम प्रसिद्ध आहेच. एवढेच नाही तर, सौर वाऱयामधील भारीत कण गोळा करण्याच्या मोहिमा आखल्या जात आहेत. जेनेसिस यानाने हे प्रयत्न केले होते, पण त्यात यश मिळाले नाही.

चंद्र हा आपला एकमेव उपग्रह आहे. पृथ्वीवरील संसाधनांचा केलेला अतिवापर याविषयी कितीही बोलले तरी ते कमीच आहे. त्याचे भयानक परिणाम आपण भोगतो आहोत. पुढच्या पिढय़ांना ते अजूनच तीव्र स्वरूपात भोगावे लागतील. चंद्राचे पण असेच होईल का? आज गोल दिसणारा चंद्र आणि त्यावरील डोंगर आणि विवरांच्या सुंदर नैसर्गिक रचना तशाच दिसतील का, राहतील का, असा भाबडा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे!

अवकाशसंदर्भात काही करार अस्तित्वात आहेत. 1967 साली बाह्य अवकाश संपत्ती गैरवापर प्रतिबंधक करार झालेला होता. 2020च्या आर्टेमिस ऍकार्ड्सनुसार राष्ट्रांनी एकमेकांमध्ये समन्वय आणि सूचित करण्याच्या कर्तव्याची पुष्टी करणे गरजेचे आहे; परंतु यातून ठोस आणि कडक कायदा समोर येत नाही. सध्या मात्र चंद्राविषयी चर्चा होताना त्यात वैज्ञानिक विरुद्ध व्यापारी हेतू आणि चंद्रावरील संसाधने कोणी व किती पृथ्वीवर आणावी किंवा पृथ्वीवरून चंद्रावर न्यावीत याविषयी रोख दिसतो. यामुळे अवकाश कायद्यांची निर्मिती व विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. अंतराळ संसाधने व्यवस्थापित करण्यासाठी सर्वंकष आंतरराष्ट्रीय कायदेशीर व्यवस्था ही दूरची संभावना दिसत असली तरी महत्त्वपूर्ण वैचारिक पाया आधीच अस्तित्वात आहे. आपण अपेक्षित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज ठोस, स्थानिक उपाययोजना अंमलबजावणीस प्रारंभ करू शकतो किंवा कमीतकमी विचार-विनिमय तरी करू शकतो.

z [email protected] 

(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)