‘मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत’, पंजाबच्या डीआयजींनी दिला राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केलं असून केंद्र सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान शेतकऱ्यांचा आंदोलनाला दिवसानुदिवस देशभरातून पाठिंबा वाढताना दिसत आहे. तसेच अनेकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार देखील परत केले आहेत. अशातच आता या आंदोलनाला पाठिंबा देत पंजाबचे पोलीस उपमहानिरीक्षक लखविंदरसिंग जाखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, लखविंदरसिंग जाखड राजीनामा देत म्हणाले आहेत की, ‘मी कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे.’

नवीन कृषी कायद्यांबाबत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 18 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीतही आंदोलक शेतकरी दिल्ली सीमेवर आहेत. दरम्यान, रविवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि अन्य नेते गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.