
वरळी, प्रभादेवी, लोअर परळ भागांतून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून त्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्सजवळ तयार करण्यात आलेले जम्बो कोरोना केंद्र बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाने मुंबईत शिरकाव केल्यानंतर जी/दक्षिण विभागात येणाऱया वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या भागांतील वरळी कोळीवाडा यासारख्या दाटीवाटीच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले होते. त्यामुळे वरळीतील पोद्दार रुग्णालय, वरळी डोम आणि त्यानंतर महालक्ष्मी रेसकोर्सच्या बाजूला जम्बो कोरोना केंद्रे तयार करण्यात आली होती. या भागांत रुग्णसंख्या वाढली तर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने ही केंद्र उभारून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम केली. यात महालक्ष्मी येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोरोना केंद्रात 900 बेड उपलब्ध करून देण्यात आल्या तर गंभीर रुग्णांनाही तातडीने उपचार मिळावेत, यासाठी 200 ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे हे 900 बेड बंद करून केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी 200 ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
बंद होणारे पहिले जम्बो केंद्र
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाल्यानंतर अनेक छोटे-मोठे कोरोना केंद्र बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला आहे. मात्र, मुंबईत जम्बो सुविधा देणारे बंद होणारे हे पहिलेच केंद्र आहे. दरम्यान, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ भागांतील कोरोना रुग्णांसाठी हे केंद्र तयार करण्यात आले होते. मात्र, आता या भागांत रुग्ण कमी झाल्यामुळे हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महालक्ष्मी रेसकोर्सचे अधिष्ठाता डॉ. कुमार डुसा यांनी दिली.
























































