प्रवासी वाढले तसे लोकलच्या अपघाती मृत्यूच्या संख्येत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरीय लोकलच्या रोजच्या धकाधकीच्या प्रवासात दररोज सरासरी दहा प्रवाशांचा मृत्यू होत असतो. मात्र 22 मार्च रोजी जसे कोरोना साथीच्या आजाराने लॉकडाऊन घोषित झाले तसे लोकल सेवा ठप्प झाल्याने रोजच्या मृत्यूंची संख्याही आपोआप कमी झाली होती.

आता लॉकडाऊन शिथिल होऊन अनलॉक सुरू झाल्यानंतर उपनगरीय लोकलमध्ये जसजसे विविध अत्यावश्यक वर्गातील प्रवाशांना मंजुरी मिळू लागली तसतशी मुंबईतील लोकल अपघातातील मृत्यूंच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

लॉकडाऊनपूर्वीच्या जानेवारी ते मार्च 2020 या तीन महिन्यांमध्ये 558 जणांचा उपनगरीय लोकल अपघातात मृत्यू झाला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 22 मार्च ते 15 जूनपर्यंत लोकल सेवा संपूर्ण बंद झाल्याने तसेच त्यानंतर अत्यंत मर्यादित फेऱया चालविण्यात आल्याने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत अपघाती मृत्यूची संख्या घटून 115 वर आली होती. आता पुन्हा लोकलमधून प्रवास करणाऱया अत्यावश्यक कर्मचाऱयांची संख्या जसजशी वाढू लागली तशी लोकल अपघातातील मृत्यूंची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांत 314 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांतील (115 मृत्यू) मृत्यूच्या तुलनेत दुपटीहून अधिक झाली आहे.

64 टक्के मृत्यू रूळ ओलांडल्याने…

22 मार्च ते 15 जूनपर्यंत लोकल ट्रेन जरी लॉकडाऊनमुळे संपूर्ण ठप्प झाल्या होत्या तरीही मालगाडय़ांची तसेच वर्कमेन्स स्पेशल गाडय़ांची वाहतूक सुरूच असल्याने रेल्वेचे रूळ ओलांडल्याने होणारे अपघाती मृत्यू थांबले नव्हते. परंतु लोकलची वर्दळ कमी झाल्याने लोकलमधून पडून होणारे अपघात त्या काळात घटले होते. या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान लोकल अपघातात एकूण 987 जणांचा मृत्यू झाला असून यातील 64 टक्के मृत्यू रूळ ओलांडताना झाले आहेत.

आता दररोज 15 लाख प्रकाशांची वाहतूक

अनलॉकमध्ये आता मध्य आणि पश्चिम रेल्वे आपल्या लोकल फेऱया नव्वद टक्के क्षमतेने चालवित आहेत. लॉकडाऊनपूर्वी मध्य रेल्वे दररोज 1774 तर पश्चिम रेल्वे 1376 फेऱया अशा एकूण 3,150 फेऱया चालवायची.  त्याद्वारे दररोज 75 लाख प्रवाशांची वाहतूक दररोज व्हायची. मध्य रेल्वे आता दररोज 1572 तर पश्चिम रेल्वे 1201 फेऱया अशा एकूण 2773 फेऱया चालवत आहे. अजूनही सर्वसामान्यांना लोकलमध्ये प्रवेश नसला तरी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून राज्य सरकारने मंजुरी दिलेले जवळपास 14 ते 15 लाख अत्यावश्यक कर्मचारी दररोज प्रवास करीत आहेत.

उपनगरीय लोकल – अपघाती मृत्यूचा आलेख

महिने             2020         2019

जाने-मार्च       558           696

एप्रिल-जुलै      115           843

ऑगस्ट-नोव्हें   314           919

जाने-नोव्हें (एकूण)         987 2,458