
कुडाळ – वेंगुर्ले या मार्गावर वाडीवरवडे – गोवेरी फाटा येथे मोटरसायकल व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार समीर गावडे (30) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. ही घटना रविवारी रात्री सव्वासातच्या सुमारास घडला.
वाडीवरवडे येथील गोवेरी फाटा येथे आतील रस्तावर असलेला डंपर चालक आपल्या ताब्यातील डंपर मागे घेत रस्तावर आणत होता. याचवेळी समीरच्या मोटरसायकलची डंपरला जोरदार धडक बसली. या अपघातांनंतर रस्त्यावर जखमी अवस्थेत समिर हा पडला होता. या घटनेदरम्यान वेतोरे सरपंच संदिप चिचकर हे आपल्या चारचाकी वाहनातून तेथून जात होते. त्यांनी जखमी समीरला तात्काळ आपल्या वाहनातून कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचे निधन झाले.
या अपघातात मोटरसायकलचा पुर्णत: चुराडा झाला. या अपघातात समिर यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तवला आहे. अपघातानंतर वेतोरे येथील ग्रामस्थांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. समीर हा मोलमजुरी करायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.





























































