बापरे! दिवसातील 7 तास, स्मार्टफोन हातात!! लॉकडाऊनमध्ये हिंदुस्थानींचा फोनचा दैनंदिन वापर वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात हिंदुस्थानींना स्मार्टफोनने अक्षरशः याडं लावल्याचे दिसतेय. गेल्यावर्षी हिंदुस्थानी दिवसातले सरासरी पाच तास स्मार्टफोनचा वापर करत होते. यात आता लक्षणीय वाढ झाली असून सध्या हिंदुस्थानी दिवसातले सरासरी सात तास स्मार्टफोनवर वेळ घालवत असल्याचे सीएमआरच्या अहवालातून पुढे आले आहे. कोरोनाकाळात वर्क फॉम होम आणि ऑनलाइन शाळा सुरू असल्याने स्मार्टफोनचा वापर वाढल्याचेही अहवालात म्हटले आहे.

स्मार्टफोन आणि मानवी संबंधांवर होणारे त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण मोबाईल कंपनी वीवोने कर्नाटकच्या सीएमआर विद्यापीठाच्या सहकार्याने केले होते. यात देशातील प्रमुख आठ शहरांमधील 15 ते 45 वयोगटातील दोन हजार नागरिकांची मते जाणून घेतली होती. त्यात 70 टक्के पुरूष आणि 30 टक्के महिलांचा समावेश होता. अभ्यासात यावर्षी एप्रिलनंतर स्मार्टफोनच्या दैनंदिन वापरात 25 टक्के आणि कॉलिंगमध्ये 63 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.

सोशल मिडियावर सक्रीय राहण्यासाठी स्मार्टफोनचा वापर 55 टक्क्यांनी तर विरंगुळा म्हणून गेमिंगसाठी 45 टक्क्यांनी वाढला आहे. गंमत म्हणजे फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोनचा दैनंदिन वापर 14 मिनिटांवरून 18 मिनिटांवर पोहोचला आहे.

स्मार्टफोनचे लागले व्यसन

सर्वेक्षणातील धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 84 टक्के लोकांनी आपण सकाळी उठल्यावर 15 मिनिटांच्या आत मोबाईल हातात घेतो असे सांगितले आहे तर 46 टक्के नागरिक ओळखीच्या व्यक्तींशी गप्पा मारताना तासाभरात किमान पाच वेळा आपला फोन तपासतात. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देता येत नाही अशी तक्रार आता काहीशी दूर झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी हिंदुस्थानी दिवसातील सरासरी 4.4 तास वेळ आपल्या कुटुंबियांना देत होते. आता ही वेळ सरासरी साडेपाच तासांवर पोहोचली आहे.