
दिवंगत आमदार भारत भालके यांनी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हा त्यांच्या पक्षप्रवेशासाठी जमलेल्या जनसमुदायाने त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती दिली. बोलायला लागल्यानंतर त्यांच्या प्रती जनतेत असलेली संवेदनशीलता कायम जाणवत राहायची. कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा हा पैलवान जनतेच्या हितासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार भारत भालके यांना शोकप्रस्तावातून श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या आजी माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सभागृहात मांडला. यात त्यांनी दिवंगत आमदार भारत भालके, माजी मंत्री विष्णू सवरा, माजी मंत्री प्रा. जावेद इक्बाल खान, माजी राज्यमंत्री विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी सदस्य तारासिंह नंदराजोग सरदार, अनंतराव आप्पाराव देवसरकर, नरसिंगराव घारफळकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे आणि डॉ. जगन्नाथ सीतारामजी ढोणे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याला उजाळा दिला.
दिवंगत भालके यांच्या सामाजिक तसेच सहकार चळवळीतील आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱयांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा गौरव यावेळी सर्व सदस्यांनी केला. दिवंगत सवरा यांच्या शांत, संयमी स्वभावाचा उल्लेख करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी तसेच पुपोषणमुक्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला.
प्रा. जावेद इक्बाल खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव शोकप्रस्तावावर बोलताना सदस्यांनी केला. दिवंगत विनायकराव पाटील यांच्या पृषी, वन, सहकार क्षेत्रातील कार्याविषयी तसेच प्रयोगशील व्यक्तिमत्त्वाबाबतच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.
शब्दाला जागणारा नेता
अनंतराव देवसरकर यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. अनंतराव देवसरकर यांनी दिलेला शब्द कधी फिरवला नाही. शब्दाला जागणारा नेता, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. तर सरदार तारासिंह यांनी नातेसंबंध जोपासताना त्यामध्ये कधीही राजकारण आणले नाही. भाजपसोबत युती तुटल्यानंतरही ते आले व ये तो चलता है, राजकारण आपल्या जागी राहील, आपले नाते महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. तारासिंह यांच्या जाण्याने एक प्रामाणिक जनसेवक गमावाला अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला.




























































