
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 डिसेंबरपासून अॅडलेड येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. मात्र या डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडियाचा अंतिम 11 जणांचा चमू कोणता असेल याबाबत अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. हिंदुस्थानी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे पत्रकार परिषदेत म्हणाला की, कसोटी सुरू होण्यासाठी आणखी एक दिवस बाकी आहे. टीम इंडियाचा आणखी एक सराव होणे बाकी आहे. त्यानंतरच अंतिम 11 जणांचा चमू निवडण्यात येईल.
हिंदुस्थानकडे सलामीवीराच्या जागांसाठी चार पर्याय आहेत. यामध्ये पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, शुभमन गिल व लोकेश राहुल या खेळाडूंचा समावेश आहे. शुभमन गिलने आयपीएलसह सराव सामन्यातही ठसा उमटवला आहे. लोकेश राहुल व मयांक अग्रवालने आयपीएलमध्ये आपली चुणूक दाखवली आहे. पृथ्वी शॉकडून बऱयाच अपेक्षा बाळगल्या आहेत. त्यामुळे कोणत्या दोन सलामीवीरांना टीम इंडियाच्या अंतिम संघात संधी देण्यात येईल हे पाहणे रंजक ठरेल. रिद्धीमान साहा व रिषभ पंत या यष्टिरक्षकांमध्येही कमालीची चुरस दिसून येत आहे. अनुभव व युवामध्ये संघ व्यवस्थापन कोणाला पसंती देतेय हे पाहायला नक्कीच आवडेल.
ती 40 ते 50 मिनिटे फलंदाजांसाठी आव्हानात्मक
अॅडलेड येथील डे-नाईट कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियममध्ये फ्लडलाइट्स सुरू करण्यात आल्यानंतर गुलाबी चेंडूमध्ये होणार फरक फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. याबाबत अजिंक्य रहाणे म्हणाला, लाल चेंडू आणि गुलाबी चेंडू या दोन्ही प्रकारच्या चेंडूने कसोटी क्रिकेट खेळण्यात फरक आहे.
20 विकेट घेण्याची क्षमता
अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. यावेळी अजिंक्य रहाणे म्हणाला, इशांत शर्मा हा हिंदुस्थानचा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल, पण आमच्याकडे प्रतिस्पर्धी संघातील 20 फलंदाज बाद करण्याची क्षमता नक्कीच आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या दोघांसह नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांच्याकडूनही अपेक्षा आहेत.



























































