
मुंबईतल्या म्हाडाच्या 56 वसाहतींमधील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. म्हाडाच्या वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी अभय योजना तयार करून त्याचा लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. त्यामुळे म्हाडा वसाहतींमधील असंख्य रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील म्हाडा वसाहतींमधील सेवा शुल्काचा विषय गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. काळाचौकी येथील अभ्युदय नगरमधील रहिवाशांना मागील वीस वर्षांपासूनचे थकित सेवा शुल्क भरण्याच्या नोटीसा मध्यंतरी बजावण्यात आल्या होत्या. या रहिवाशांना एक लाख रुपये पंधरा दिवसांच्या आत भरण्याची नोटीस म्हाडाने दिली होती. त्यामुळे या वसाहतीमधील रहिवासी हवालदिल झाले होते. या रहिवाशांनी म्हाडाकडे धाव घेतली होती. पण हा प्रश्न प्रलंबित होता
मुंबईत म्हाडाच्या 56हून अधिक वसाहती आहेत. या वसाहतींना म्हाडाच्या वतीने विविध सेवासुविधा पुरवल्या जातात. या सोसायटय़ांना मागील वीस वर्षांपासूनचे सेवा शुल्क भरण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. या सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सेवा शुल्क वाढवण्यास 2003 मध्येच स्थगिती दिली होती.
पण तरीही म्हाडाने सेवा शुल्क वाढवल्याचा दावा रहिवाशांनी केला होता. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार आम्ही दरमहा सरासरी 150 रुपये सेवा शुल्क भरतो पण म्हाडाने सेवा शुल्काची रक्कम सुमारे 1 हजार 27 रुपये केली आहे. आणि 1998पासूनचे सेवा शुल्क भरण्याची नोटीस पाठवली. अभ्युदय नगरमध्ये म्हाडाच्या सुमारे 48 इमारती असून त्यातील 3 हजार 366 घरांना वाढीव सेवा शुल्क भरण्याची नोटीस पाठवली होती.
या बैठकीत स्वदेशी मिल कंपाऊंडमधील कामगारांच्या घराबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवानिवासस्थानाच्या संदर्भातही चर्चा झाली.
बैठकीला परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार मंगेश कुडाळकर, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर उपस्थित होते.
अभय योजनेचा प्रस्ताव
या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, म्हाडाच्या थकीत सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावे.
रहिवाशांच्या तक्रारांची दखल घेऊन सरकारने सेवा शुल्कात सवलत देण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने अभय योजना लागू करण्याची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी बैठक घेतली.



























































