
मलेरिया आणि त्याचा मेंदूवर होणारा परिणाम यासंदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन ओडिशातील सेंटर फॉर स्टडी ऑफ कॉम्प्लेक्सच्या संशोधकांनी केले आहे. त्यामुळे गेल्या 100 वर्षातील मलेरियाचा गुंता सोडवण्यात संशोधकांना यश आलेय. या शोधामुळे मुले आणि प्रौढांमध्ये मलेरियाचे वेगवेगळे परिणाम कसे दिसतात, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
मेंदूवर परिणाम करणारा सेरेब्रल मलेरिया हा प्राणघातक आणि जीवघेणा आहे. सेरेब्रल मलेरियाग्रस्त दर पाच जणांपैकी एकाचा उपचारानंतर मृत्यू होतो.
संशोधकांनी सांगितले की, गेल्या शंभर वर्षांपासून मलेरियाचा मेंदूवर कसा परिणाम होतो, याबद्दल सर्वांना गोंधळात टाकले होते. नव्या संशोधनात या आजारातून सावरलेल्या आणि आपले प्राण गमावलेल्या वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांच्या मेंदूचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. अभ्यासाठी एमआरआय स्कॅनिंग वापरण्यात आले. रुग्णांमध्ये वाढत्या वयानुसार, मेंदूत सूज येण्याची तक्रार कमी होते. नव्या संशोधनामुळे रुग्णानुसार उपचारांचा मार्ग मोकळा झाला आहे.




























































