नरभक्षक बिबटय़ा माढा तालुक्यात असण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबटय़ाचा कदाचित माढा तालुक्यात प्रवेश झाला असण्याची शक्यता वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी वर्तविली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन माढय़ाचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.

जुलै, ऑगस्ट महिन्यात बिबटय़ाने माढा तालुक्यातील बेंबळे, परिते, अकोले  बुद्रूक या परिसरात धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱयांनी त्याला उसाच्या फडातून बाहेर जाताना पाहिले होते. या बिबटय़ाने अचानक पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी काठाकडे मोर्चा वळवला होता. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून एका नरभक्षक बिबटय़ाने करमाळा तालुक्यातील पूर्व, पश्चिम भागात धुमाकूळ घातला आहे. त्याला पकडण्यासाठी वनरक्षक अधिकारी, पोलीस यंत्रणा, ड्रोन कॅमेरे, हेलिकॉप्टर आदी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत; परंतु त्याने आजवर सर्वांना हुलकावणी दिली आहे. त्यामुळे या बिबटय़ाने माढा तालुक्याच्या बेंबळे, टेंभुर्णी परिसर किंवा कोंढार भागात प्रवेश केला असण्याची शक्यता वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांमार्फत माढा महसूल विभागाला कळवण्यात आली आहे.

टेंभुर्णी, बेंबळे, कोंढार भाग हा परिसर केळी, द्राक्षे, ऊस, डाळिंब आदी पिकांचे आगर आहे. बिबटय़ासारखा हिंस्र प्राणी कुठेही दडून हल्ला करू शकतो. त्यामुळे वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱयांच्या सूचनेनुसार माढय़ाच्या तहसीलदारांनी या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.