सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भावावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात झोपलेल्या सख्ख्या बहिणीसोबत अश्लील चाळे करून भावानेच तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत आई-वडिल व भावाने जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून बहिणीला हाताने व लाकडाने मारहाण केली. याबाबत नराधम भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबरपासून 16 डिसेंबर 2020 या कालावधीत बोपखेल रामनगर येथे घडली. पोलिसांनी 25 वर्षांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बहीण आई-वडिलांकडे राहते. तिला दोन भाऊ आहेत. त्यापैकी आरोपी भाऊ आई वडिलांना नेहमी त्रास देतो. पीडित मुलगी घरात झोपलेली असताना आरोपी भाऊ तिच्याजवळ झोपला आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. याचा जाब आई, वडील आणि दुसऱ्या भावाने विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच पीडित महिलेला हाताने व लाकडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत.