रत्नागिरीत 41 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. खासगी प्रवासी बसमधून गांजाची वाहतूक सुरु होती. आज पहाटे मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे मुंबई ते राजापूर दरम्यान जाणार्‍या  एका खासगी  बसमध्ये 41 हजार रुपये किंमतीचा 2 किलो 141 ग्रॅम वजनाचा गांजा पोलीसांनी पकडला़. त्याचबरोबर खेड तालुक्यात एकाकडून 16 हजार रुपये किंमतीचा 803 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

तरुण पिढी अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे. त्यामुळे अशा अंमली पदार्थाच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी धडक कारवाई सुरु केली आहे़. आज पहाटे मुंबई गोवा महामार्गावर खासगी बसमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गांजा पकडल्याने खळबळ उडाली आहे़. एक खासगी बस पोलिसांनी हातखंबा तिठा येथे थांबवली़. गाडीचे चालक महादेव लक्ष्मण धवळगीर आणि प्रतिक हरिश्चंद्र  यांच्या ताब्यातील चालकाच्या केबीनमधील एका सॅकमध्ये  41 हजार रुपये किंमतीचा 2 किलो 141 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला़. पोलिसांनी खासगी बससह गांजा जप्त करत त्या दोघांना अटक केली आहे़.

खेडमध्ये  16 हजार रुपये किंमतीचा गांजा पकडला

खेड तालुक्यातील जलालशहा मोहल्ला परिसरात गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अंमलदार यांनी जलालशहा मोहल्ला येथील रेल्वे बोगद्यात जाणार्‍या रस्त्यावर मासूम कालवे,  याने विक्रीसाठी आणलेला 16 हजार रुपये किंमतीचा 803 ग्रॅम गांजा पोलीसांनी जप्त केला आहे.