राज्यात दिवसभरात 4,467 जण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 94.17 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला चांगले यश येत असून राज्यात आज दिवसभरात 4 हजार 467 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.17 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 994 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 75 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.57 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 19 लाख 96 हजार 624 चाचण्या झाल्या असून 18 लाख 88 हजार 767 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 5 लाख 3 हजार 886 जण होम कोरेंटाईन असून 4 हजार 168 जण संस्थात्मक कोरेंटाईन आहेत.

मुंबईत दिवसभरात 642 कोरोना रुग्ण

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 642 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 355 जण कोरोनामुक्त झाले.

मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, राज्य सरकार आणि आयसीएमआर काही ठरावीक कालावधीनंतर रुग्णसंख्या, कोरानामुक्त, मृत्युसंख्याबरोबर एपूण आकडेवारीची शहानिशा करून (रिकन्सीलेशन) मुंबईबाहेरून आलेल्या रुग्णांची नोंद एपूण आकडेवारीतून वगळली जाते. हा अहवाल राज्य आणि आयसीएमआर तयार करतात. ही शहानिशा केल्यामुळे आज एपूण मृतांची संख्या कमी होऊन 10 हजार 970 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणार्यांची एपूण संख्या 2 लाख 66 हजार 456 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे.