
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.
कोरोना काळात निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. आता निवडणुका जाहीर झाल्याने प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम शनिवारी जाहीर केला.
यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. त्यावरून राजकारण तापले होते. प्रकरण न्यायालयातही गेले होते. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर कोपरगाव मतदार संघातील उक्कडगाव, तिळवणी, अंजनापूर, घारी, मनेगाव, मळेगाव थडी, सांगवी भुसार, वेळापूर, जेऊर पाटोदा, काकडी म.,नाटेगाव, कासली, ओगदी, आंचलगाव, कोळगाव थडी, मायगाव देवी, हिंगणी, रवंदे, संवत्सर, देर्डे चांदवड, मढी खुर्द, मढी बुद्रुक, धोंडेवाडी, सोनारी, आपेगाव, येसगाव, टाकळी, कोकमठाण, जेऊर कुंभारी या 29 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणुकीची नोटीस मंगळवारी 15 डिसेंबरला प्रसिद्ध झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख बुधवार 23 डिसेंबर ते बुधवार 30 डिसेंबरपर्यंत आहे. त्यात 25,26,27 हे सुटीचे दिवस वगळण्यात आले आहेत. अर्ज छाननी गुरुवारी 31 डिसेंबर रोजी सोमवारी 4 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 4 जानेवारी दुपारी 3 वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवारी 15 जानेवारीला होणार आहे.
मतमोजणी 18 जानेवारीला होणार
तहसील कार्यालय कोपरगाव येथे 18 जानेवारीला सकाळपासून मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली. त्यांना मदत म्हणून निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे हे काम करीत आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत असताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असताना ग्रामीण भागात निवडणुकांची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

























































