शब्दचित्र – माध्यम यात्रेतील माणसं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविराज गंधे

लेखक-माध्यमतज्ञ रविराज गंधे यांनी साहित्य, संगीत, सिनेमा आदि क्षेत्रातील बुजुर्ग नामवंत साहित्यिक कलावंतांच्या विविध माध्यमांसाठी घेतलेल्या निवडक मुलाखती ‘माध्यमयात्रेतील माणसं’ या पुस्तकरूपात 25 डिसेंबर रोजी ग्रंथाली वाचक दिनाच्या निमित्ताने रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे होणाऱया सोहळ्यात प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील शीर्षक लेखातील संपादित अंश…

माणूस आपल्या जीवनाचा प्रवास करीत असताना विविध प्रकारच्या सुखदुःखांची कडू-गोड आठवणीची, अनुभवांची मानापमानाची यशापयशाची अनेक रंगीबेरंगी गाठोडी अंगावर वाढवीत असतो. कधीतरी प्रवासाच्या एका टप्प्यावर एकांतात बसून ही सारी गाठोडी तो उघडतो आणि त्यात हरवून जातो. आपण आपल्या आयुष्यात काय मिळवलं आणि काय गमावलं याचा विचार करु लागतो. आज ‘माध्यम यात्रेतील माणसं’ या पुस्तकासाठी हा लेख लिहिताना माझी मनोवस्था काहीशी अशीच होते आहे.

माध्यम आणि लेखन क्षेत्रात मला वाटणाऱया मी केलेल्या कामगिरीचा वाटा हा छोटासा खारीचा आहे. या छोटय़ाशा प्रवासात मागे वळून पाहिल्यावर मला अनेक माणसं, व्यक्तिमत्व, प्रसंग, घटना नजरेसमोर तरळायला लागतात. कधी ती माणसे प्रत्यक्षात भेटलेली असतात, त्यांचा स्नेह- मैत्री आणि मार्गदर्शन लाभलेले असते तर कधी असंख्य उत्तुंग व्यक्तिमत्वे पुस्तकातून, सिनेमा- नाटकातून, कथा-कादंबऱयांतून भेटतात आणि माझ्या मनावर खोलवर परिणाम करून जातात. दूरदर्शनच्या नोकरीमुळे मुंबईतील वास्तव्यात मला असंख्य प्रतिभावान कलावंत, लेखक, पत्रकार-संपादक कवी, विचारवंत, समाजसेवक, राजकारणी, गायक, संगीतकार अशी अनेक विविध क्षेत्रांतली गुणी मित्र मंडळी भेटत गेली त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याशी मनसोक्त सुख संवाद झाला. माणसांचे एक सुंदर शक्तिमान जग पाहण्याची आणि माणसांना वाचण्याची, त्यांना समजून घेण्याची मला संधी मिळाली.

दूरदर्शनच्या नोकरीमुळे विविध प्रसंगी कार्यक्रमांच्या ध्वनी- चित्रमुद्रणाच्या निमित्ताने निवडणुकांच्या वेळी, अनेक मंत्री, राजकीय नेते मंडळी यांची नेहमी दूरदर्शन केंद्रावर गाठभेट होत असे. परंतु त्या वर्तुळात माझा फारसा वावर नव्हता. काही धडाडीच्या कार्यक्षम कला- साहित्यप्रेमी राजकीय मंडळींबरोबर एकत्र काम करण्याचा योग मात्र आला होता. त्याची नोंद करावी असे मला आवर्जून वाटतं.

आज जरी दूरदर्शनची लोकप्रियता कमी झालेली असली तरी एकेकाळी दूरदर्शनचे निवेदक, कार्यक्रम, कार्यक्रमांचे कलावंत, सूत्रसंचालक आणि निर्माते मंडळींना लोकप्रियतेचे वलय होते. ते सेलिब्रिटी म्हणून ओळखले जायचे. तो काळ बहारीचा आणि गमतीचा होता. भक्ती बर्वेनंतर अन्य निवेदिका हा कार्यक्रम सादर करीत असत. एकदा एका निवेदिकेने ‘आराधना’ या चित्रपटाची घोषणा करताना निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंत ऐवजी दत्ता सामंत यांचं नाव घेतलं. कार्यक्रम थेट प्रक्षेपित होत असल्याने ही चूक महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांनी ऐकली. झालं असं होतं की, कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुप्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत यांची मुंबईत निर्घृण हत्या झाली होती, त्या घटनेच्या ठळक बातम्या -फोटो सर्व वर्तमानपत्रात दुसऱया दिवशी सकाळी प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र तीच एक हेडलाईन होती. सकाळी ते पेपर निवेदिकेने वाचले आणि अनवधानाने डोक्यात रेंगाळणारे दत्ता सामंत यांचे नाव घोषित केले.

अशा अनेक गमतीजमती कार्यक्रम निर्मितीच्या वेळी घडत असत. एकदा मी कोल्हापूरला मराठी चित्रपटसृष्टीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्या समारंभाचं चित्रीकरण करायला गेलो होतो. त्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांची प्रमुख पाहुणे म्हणून भाषणे झाली. कार्यक्रम संपल्यावर तातडीने मी माझ्या टीमसह मुंबईला पोहोचलो आणि दुसऱया दिवशी कार्यक्रम संकलित करून संध्याकाळी प्रसारित केला. त्या कार्यक्रमातील एका दृश्यात सुधीर फडके भाषण करीत असताना आणि ते आपलेच भाषण प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवीत ऐकत आहेत असे दृश्य काही सेकंद गेले. असे एक-दोन वेळेला झाले ते पाहून प्रेक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळली. कार्यक्रम घाईगर्दीत संकलित झाल्याने एडिटरने वेगळ्या काढून ठेवलेल्या प्रेक्षकांच्या audiyance shot मधील चुकून सुधीर फडके यांचा शॉट त्यांच्याच भाषणाला लावला आणि गंमत घडली! दुसऱया दिवशी सुधीर फडके यांचा मला फोन आला तेव्हा ते म्हणाले, ‘गंधे, कार्यक्रम चांगला झाला, पण मला माझा डबल रोल याच जन्मात जिवंतपणी पाहायला मिळाला. त्यामुळे मजा आली!’

माध्यमात काम करताना जरी विविध क्षेत्रांतील लोकप्रिय व्यक्ती, सेलिब्रिटीज आणि बडय़ाबडय़ा माणसांमध्ये तुमचा वावर असला किंवा तुमचे व्यक्तिगत स्नेहसंबंध असले तरी तुमचा स्वतःचा असा खास जिवलग मित्रमंडळींचा एक खजिना असतो. अशा मित्रांबरोबर सुख-संवाद साधून भावभावनांना रितं करण्याची, वैचारिक देवाण-घेवाण करण्याची आपल्या सर्वांचीच एक नितांत गरज असते. अशा मित्रांबरोबरच्या गप्पा-मैफली, सहवास, एकत्र केलेल्या कामांच्या आणि प्रवासाच्या आठवणी आपल्याला सदैव ताजंतवानं ठेवतात. अशा असंख्य मित्ररूपी लखलखणारे हिरे आपल्या खजिन्यात असतात. अशा मित्रांपैकी कुणाकुणाची अन् किती नावं घ्यावी? माझ्या माध्यम यात्रेतील अशा असंख्य मित्रांबरोबर मध्यरात्रीपर्यंत चमचमणाऱया ग्लासातल्या गप्पांचा फड आठवला की आजही मन गहिवरून येते. डोळ्याच्या कडा पाणावतात. या माध्यम प्रवासात माझ्याविषयी कौतुकाची-आदराची भावना बाळगणाऱया कलाक्षेत्रातील गोड स्वभावाच्या, सुंदर, गुणी मैत्रिणींची मैत्री लाभली. त्यांच्या सहवासात माझं आकाश निळ होत गेलं. हे माझे सगळे मित्र-मैत्रिणी या माझ्या बँकाच आहेत. सरतेशेवटी क्षेत्र कुठलेही असो, माणसांना माणसांचं वेड असतं. सामान्य रसिकाचं आणि कलावंतांचं नातं हे प्रेमाचं असतं. कलेच्या या वेडापायी जेव्हा हरहुन्नरी गुणी माणसं भेटत राहतात तेव्हा माझा त्यांच्याशी कुतुहलापोटी सुखसंवाद सुरू होतो. हेच माझ्या माध्यम यात्रेचे श्रेयस आणि प्रेयस आहे!

जवळपास चार दशकांचा माध्यम आणि लेखन क्षेत्रातला प्रवास, शेकडो कार्यक्रम, असंख्य माणसं, अनेक घटना- प्रसंग, पुरस्कार, सत्कार समारंभ, जाहीर भाषण, गुणी मंडळींचा, मित्रांचा सहवास आणि स्नेह, देश-विदेशातील प्रवास अशा अनेकविध रंगीबेरंगी गोष्टींचा सुंदर कॅलिडोस्कोप माझ्या नजरेसमोरून सरकत आहे. त्यातील मनोहारी रंग पाहून माझं मलाच आश्चर्य वाटते. हे सारं आपण केलं की कुणी तरी आपल्याकडून करून घेतलं! आयुष्यातील आठवणींच्या चांदण्यात मी जेव्हा जेव्हा हरवतो तेव्हा माझ्या ओठांवर ना. धों. महानोर यांच्या कवितेतील ह्या ओळी येतात–

अशी कोणती पुण्याई येई फळाला
चांदणे लगडून येई जोंधळ्याला!