
संभाजीनगराहून जालन्यात येऊन मोटार सायकल चोरी करुन त्याची बुलढाणा जिल्ह्यात विक्री करणाऱ्या चोरट्यांना चंदनझिरा पोलिसांच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांच्या 5 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई रविवारी जालन्यात करण्यात आली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जालना शहरात मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक विशेष पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. दुचाकी चोर व चोरी झालेल्या गाड्याबाबत माहिती काढून वाहने जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
चंदनझिरा डी.बी. पथकप्रमुख प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण, अनिल काळे सुंदरनगर येथे गस्त घालत असताना एक व्यक्ती विनानंबरच्या मोटारसायकलवरुन जात असताना दिसला. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा इशारा करताच तो पळायला लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत शिताफीने ताब्यात घेत त्याची चौकशी केली. अदील सिध्दीकी शेख (रा. कोहीनुर नगर, संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.
मोटारसायकल चोर अदील सिध्दीकी शेख याच्या ताब्यातील वाहनाचे कागदपत्रे पोलिसांनी मागितले असता त्याने सांगितले की, त्याच्या साथीदार सय्यद मोबीन सय्यद लाल (रा. सुंदरनगर, जालना) याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. सय्यद मोबीन यास सुंदरनगर येथून ताब्यात घेत त्याच्या ताब्यातही एक विनानंबरची मोटार सायकल आढळून आली. त्या दोघांना अधिक विश्वासाने विचारपूस करता त्यांनी इतर गाड्या सय्यद मोबीन याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सासुरवाडी मौजे नारायणखेडा ता. देऊळगाव येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून पाच दुचाकी गाड्या जप्त करुन तपास कामी चंदनझिरा पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आल्या आहेत. यातील तीन मोटारसायकलबाबत पोलीस ठाणे चंदनझिरा येथील गुन्ह्यातील असून दोन गाडयांबाबत माहिती घेण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिराचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप सावळे, डी.बी. पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कांबळे, पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण, साई पवार, अनिल काळे यांनी केली आहे.





























































