
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत तसेच पत्रकार आणि हिंदुत्वाचे भाष्यकार प्रा. मा. गो. वैद्य यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूरच्या अंबाझरी डिझेल दाहिनीत शोकापुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी त्यांचे पुत्र धनंजय, डॉ. मनमोहन, श्रीनिवास, शशिभूषण आणि डॉ. राम हेदेखील अंत्ययात्रेसोबत होते.
संघाचा चालताबोलता कोश होते
आम्हाला नंतरच्या पिढीतील कार्यकर्त्यांना कोणताही संदर्भ हवा असल्यास आम्ही त्यांच्याकडे धाव घेत होतो. त्यांना डॉ. हेडगेवारांपासून सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे भाग्य लाभले होते. संघ परिवारातील ते पितृतुल्य व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मा. गो. वैद्य यांना आदरांजली अर्पण केली.





























































